शिक्षक-शिक्षकेतर समस्या निवारण सभेत वेतन पथक अधीक्षक जयप्रकाश जीपकाटे यांचा सत्कार

शिक्षक-शिक्षकेतर समस्या निवारण सभेत वेतन पथक अधीक्षक जयप्रकाश जीपकाटे यांचा सत्कार

बातमी – मंगेश बनसोड

गोंदिया – शिक्षक आमदार माननीय सुधाकरराव अडबाले यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हा परिषद गोंदिया येथे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समस्या निवारण सभा पार पडली. या सभेत वेतन पथक अधीक्षक श्री जयप्रकाश जीपकाटे यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन “कार्यतत्पर – कर्तव्यदक्ष अधिकारी” म्हणून सत्कार करण्यात आला. दर महिन्याच्या ठरावीक तारखेला किंवा त्यापूर्वीच कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतन वर्ग करण्याची मोलाची भूमिका त्यांनी बजावली असल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. अधीक्षक जीपकाटे यांच्या कार्याची सातत्यशीलता व जबाबदारीची शैली याकडे सर्वांचे लक्ष वेधून देण्याचे कार्य विदर्भ शिक्षक संघटनेचे पदाधिकारी श्री विनोद चव्हाण यांनी केले, ही बाब विशेष उल्लेखनीय ठरली. याप्रसंगी आमदार माननीय अडबाले साहेबांनी “वन मॅन आर्मी” म्हणून अधीक्षक जिपकाटे यांचे विशेष कौतुक केले. तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी माननीय श्री विशाल डोंगरे यांचेही स्वागत करण्यात आले.

सभेदरम्यान आमदार अडबाले यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्यांचे प्रत्यक्ष हाताळणी करून निवारण केले. काही प्रकरणे तात्काळ मार्गी लावली गेली, तर काही प्रकरणे ठराविक कालावधीत निकाली काढण्याचे आदेश त्यांनी शिक्षणाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या सभेला जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्याध्यक्ष श्री वितेशजी खांडेकर, विभागीय अध्यक्ष श्री प्रदीप राठोड, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री ओमप्रकाशजी गुप्ता, श्री सुनील मांढरे, विदर्भ शिक्षक संघटनेचे नेते श्री रेशीमजी कापगते, श्री शेखर भालाधरे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन श्री विनोद चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री सचिन राठोड यांनी केले. सभेच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी अधीक्षक जीपकाटे यांच्या कार्याचा गौरव करून, त्यांच्या कार्यतत्परतेचा आदर्श पुढेही कायम राहील, अशी शुभेच्छा व्यक्त केली.