विशेष वृत्त; राज्यात ५९ मोबाईल फॉरेन्सिक लॅब कार्यान्वीत; गुन्हे सिद्धतेला वेग

विशेष वृत्त; राज्यात ५९ मोबाईल फॉरेन्सिक लॅब कार्यान्वीत; गुन्हे सिद्धतेला वेग

मुंबई, दि. १२ : सध्या पोलिसांसमोर नवनवीन गुन्ह्यांचे आव्हान उभे ठाकले आहे. दिवसागणिक गुन्ह्याचे स्वरूप बदलत आहे. गुन्हेगारांकडून गुन्ह्यासाठी होत असलेल्या नवीन संकल्पनांचा उपयोग गुन्ह्याची उकल करताना अडचणीचे ठरत आहे. बदलत्या गुन्हेगारीनुसार तपासाकरिता असलेल्या यंत्रणेतही बदल होणे आवश्यक होते. त्यानुसार जलद गतीने तपास पूर्ण होण्यासाठी ‘मोबाईल फॉरेन्स‍िक व्हॅन’ (न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा) ची सुविधा राज्यात उपलब्ध करून देण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ जानेवारी २०२५ रोजी महाराष्ट्रात २१ मोबाईल फॉरेन्स‍िक व्हॅनचा शुभारंभ करण्यात आला आणि महाराष्ट्र देशातील मोबाईल फॉरेन्स‍िक व्हॅन सुरू करणारे पहिले राज्‍य ठरले. या लॅबचा विस्तार वाढवून २१ वरून ५९ मोबाईल फॉरेन्सिक लॅब सुरू करण्यात आल्या आहेत.

राज्यात मुंबई शहरातील पूर्व विभागात (चेंबूर), पश्चिम विभागात वांद्रे, उत्तर विभागात कांदिवली, मध्य विभाग भायखळा, दक्षिण विभागातील नागपाडा येथे प्रत्येकी एक व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर मुंबई उपायुक्त रेल्वे स्टेशन मध्य परिमंडळात एक व्हॅन देण्यात आली आहे. तसेच नवी मुंबई उपयुक्त परिमंडळात तीन, नागपूर उपायुक्त परिमंडळात पाच, ठाणे उपायुक्त परिमंडळात १, मीरा भाईंदर मध्ये १, पुणे १, पिंपरी चिंचवड १, सोलापूर १, नाशिक १, छ. संभाजीनगर १, अमरावती १ व्हॅनची सुविधा देण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय अंतर्गत जळगांव जिल्ह्यात ८, पालघर १, अलिबाग १, रत्नागिरी १, कोल्हापूर १, सांगली १, सातारा १, हवेली (जि.पुणे) १, सोलापूर ग्रामीण १, अहिल्यानगर ग्रामीण १, नाशिक ग्रामीण १, धुळे शहर १, नंदूरबार १, छ. संभाजीनगर १, जालना १, लातूर शहर १, धाराशिव १, हिंगोली ग्रामीण १, नांदेड शहर १, परभणी १, बीड १, अकोला १, बुलढाणा १, नागपूर ग्रामीण १, भंडारा १, वाशिम १, अमरावती ग्रामीण १, वर्धा १, यवतमाळ उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे १ व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पूर्वी मानवी निरीक्षणावर (Eye Witness) अवलंबित्व असलेल्या प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांवर आणि प्राथमिक साक्षींवर मोठा भर दिला जात असे. तसेच कमी प्रमाणात डीएनए विश्लेषण व मर्यादित स्वरूपामुळे गुन्ह्याचा तपास जलद गतीने होत नव्हता. मात्र मोबाईल फॉरेन्स‍िक व्हॅनसारख्या प्रगत तंत्रज्ञानाच्या उपयोगाने गुन्हेगारांचा मागोवा घेण्यासाठी जैव-रासायनिक, रासायनिक, जैविक, भौतिक आणि डिजिटल पुरावे गोळा करणे शक्य होत आहे.

या मोबाईल व्हॅन्समुळे गुन्ह्याच्या ठिकाणी पुरावे गोळा करण्याचे काम जलदगतीने पूर्ण होत आहे. न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या मुंबई मुख्यालयाअंतर्गत मोबाईल व्हॅनमुळे विविध गुन्ह्यांमध्ये गुन्हा घडलेल्या ठिकाणी १५५५ पुरावे गोळा करण्यात आले आहे. अमरावती कार्यालयाअंतर्गत ११२, छ. संभाजीनगर कार्यालय अंतर्गत ७१, कोल्हापूर कार्यालय अंतर्गत ३२, नागपूर प्रादेशिक कार्यालय अंतर्गत ७८१, नांदेड अंतर्गत २९, नाशिक कार्यालय अंतर्गत ८१७, पुणे अंतर्गत ३५ पुरावे गोळा करण्यात आल्याची नोंद घेण्यात आली आहे. अशाप्रकारे राज्यात आतापर्यंत एकूण ३४३२ पुरावे गोळा करून गुन्हा उकल करण्यासाठी मदत मिळाली आहे.

अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या फॉरेन्सिक व्हॅनने गोळा केलेल्या पुराव्यांमध्ये पारदर्शकता येवून गुन्हा सिद्धतेच्या कामाला वेग प्राप्त झाला आहे. सदर प्रकल्प महासंचालक (न्यायिक व तांत्रिक) संजय कुमार वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉ.विजय ठाकरे, संचालक, न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय यांच्या पुढाकाराने यशस्वीरित्या राबविण्यात येत आहे.