इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करावे
चंद्रपूर, दि. 3 : शैक्षणिक सत्र 2025-26 करीता इतर मागास प्रवर्गातील मुला-मुलींसाठी शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु झालेली आहे. त्यानुसार इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या मुला मुलींच्या वसतीगृहामध्ये तसेच आधार व स्वयंम योजनेंतर्गत 12 वी नंतर उच्च शिक्षणासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.
शासनाच्या https://hmas mabait.org या ऑनलाईन पोर्टलवर वसतीगृह, पंडित दीनदयाल स्वयंम व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना यासाठी 12 वी नंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी 1 ते 18 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज भरून ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रिंट व आवश्यक कागदपत्रे संबंधित वसतिगृहास विहीत मुदतीत सादर करावी. तसेच शासकीय वसतिगृहासाठी पात्र असलेल्या तथापि गुणवत्तेनुसार व वसतीगृहाच्या क्षमतेअभावी वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज पंडित दीनदयाल स्वयंम व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी विचारात घेतले जातील.
अधिक माहितीकरीता इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग व विशेष जाती भटक्या जमाती मुला-मुलींचे शासकीय वसतीगृह, चंद्रपूर येथील गृहपाल तसेच सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक संचालक डॉ. सचिन मडावी यांनी केले आहे.