गडचिरोली पोलीस दलातील ०७ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मा. राष्ट्रपती यांचे ‘पोलीस शौर्य पदक’ जाहिर

गडचिरोली पोलीस दलातील ०७ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मा. राष्ट्रपती यांचे ‘पोलीस शौर्य पदक’ जाहिर

मौजा हेमलकसा-कारमपल्ली रस्त्यावरील चकमकीदरम्यान जवानांनी बजावली होती उत्कृष्ट कामगिरी

देशभरामध्ये पोलीस दलात किंवा इतर सशस्त्र दलात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना स्वातंत्र्य दिनानिमित्त शासनाकडून सन्मानित केले जात असते. यावर्षी सुद्धा आज दिनांक १४ ऑगस्ट २०२५ रोजी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंधेला मा. महामहीम राष्ट्रपती यांच्यातर्फे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकुण ०७ अधिकारी व अंमलदार यांना पोलीस शौर्य पदक जाहिर झाले असून, हे सर्व अधिकारी व अंमलदार गडचिरोली पोलीस दलातील आहेत. गडचिरोली पोलीस दलास सन २०२५ मध्ये एकूण ०७ पोलीस पोलीस शौर्य पदक प्राप्त झाले असून मागील पाच वर्षात एकूण ०३ शौर्य चक्र, २१० पोलीस शौर्य पदक व ०८ गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक प्राप्त झाले आहेत.

सन २०२५ मध्ये गडचिरोली पोलीस दलातील १) सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी सुखदेव बंडगर, २) सफौ/११२७ मनोहर कोतला महाका, ३) चापोहवा/९७७ मनोहर लचमा पेंदाम, ४) पोशि/३३११ प्रकाश ईश्वर कन्नाके, ५) पोशि/५४१५ अतुल सत्यनारायण येगोलपवार, ६) पोशि/५९१६ हिदायत सदुल्ला खान, ७) शहीद पोशि/५२१० सुरेश लिंगाजी तेलामी (मरणोत्तर) यांना पोलीस शौर्य पदक मिळाले आहेत.

सन २०१७ साली सी ६० पथके पोस्टे कोठी येथून एमपीव्ही (MPV) वाहनांद्वारे भामरागडला परत येत असताना, माओवाद्यांनी भुसुरुंग स्फोट घडवून आणून पोलीस पथकांवर हल्ला केला होता. माओवाद्यांच्या हा भ्याड हल्याचा पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी विवेकबुद्धी आणि मोठ्या धैर्याने प्रतिकार केला. त्यांनी जखमी व अडकलेल्या पोलीस जवानांचे तसेच स्वतःचे संरक्षण करत माओवाद्यांच्या प्रखर गोळीबाराला प्रत्युत्तर दिले होते. वरील सर्व अधिकारी व अंमलदार यांनी सदरच्या भुसुरुंग स्फोटादरम्यान केलेल्या कामगिरीची दखल घेऊन मा. राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक जाहिर झाले आहे. यावेळी राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक प्राप्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी कौतुक केले असून त्यांच्या पुढील सेवेकरीता त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.