आता दिवसा वीज वापरा अन् बिलात सवलत मिळवा!

आता दिवसा वीज वापरा अन् बिलात सवलत मिळवा!

नागपूर, दि. 13 ऑगस्ट 2025: वीज वितरण प्रणालीच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलत महावितरणने जिल्ह्यात आतापर्यंत 2.78 लाखांहून अधिक तर वर्धा जिल्ह्यात 46 हजारावर स्मार्ट ‘टाईम ऑफ डे’ (TOD) मीटर यशस्वीरित्या बसवून कार्यान्वित केले आहेत. विशेष म्हणजे, आजवर केवळ औद्योगिक ग्राहकांना मर्यादित असलेली ‘टाईम ऑफ डे’ वीजदर सवलत 1 जुलैपासून घरगुती ग्राहकांनाही लागू झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील ग्राहकांना त्यांच्या वीज बिलात लक्षणीय बचत करण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे.

राज्य वीज नियामक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार, ज्यांच्याकडे टीओडी मीटर आहे त्यांना सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत वापरलेल्या विजेवर विशेष सवलत मिळेल. ही सवलत टप्प्याटप्प्याने वाढत जाणार आहे, यात सध्या प्रति युनिट 80 पैसे सवलत असून 2029-30 पर्यंत प्रति युनिट 1 रुपयापर्यंत ही सवलत टप्प्याट्प्प्याने वाढणार आहे. यामुळे वीज ग्राहकांनी त्यांच्याकडील वॉशिंग मशीन, गीझर, एअर कंडिशनर (AC) यांसारखी जास्त वीज वापरणारी उपकरणं सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत वापरल्यास त्यांच्या बिलात मोठी बचत होणार अहे.

याशिवाय, टीओडी मीटर वीज वापराची नोंद वेळेनुसार अचूकपणे करीत असल्याने बिलातील चुका टाळता येतात. मोबाईल ॲपवर ग्राहक त्यांचा वीज वापर कधी आणि किती होतो हे पाहू शकता. यामुळे गरजेनुसार वापर नियोजित करू शकतात. कोणत्या वेळेत वीज स्वस्त आहे हे माहीत असल्यामुळे ग्राहक अधिक जागरूकपणे वीज वापर करुन ऊर्जेची बचत करु शकतात. महावितरण हे मीटर पूर्णपणे मोफत बसवून देत आहे. तसेच, हे मीटर प्रीपेड नसून पोस्टपेड असल्यामुळे रिचार्ज करण्याची किंवा अचानक वीज खंडित होण्याची चिंता नाही.

ग्राहकांचा प्रतिसाद

नागपूर जिल्ह्यात आजवर 2 लाख 78 हजार 146 ग्राहकांकडे तर वर्धा जिल्ह्यात 46 हजार 5 ग्राहकांकडे स्मार्ट मीटर लावण्यात आले आहेत. यात नवीन वीजजोडणी, सोलार नेट मीटरिंग आणि नादुरुस्त वीज मीटर बदलून त्याठिकाणी स्मार्ट मीटर बसविल्याचा समावेश अहे.

अफवांवर विश्वास ठेवू नका!

स्मार्ट मीटरमुळे बिल जास्त येत नाही. उलट, टीओडी मीटरमुळे ग्राहक वीज वापर योग्यप्रकारे नियोजित करून बचत करू शकता. हे मीटर बसवण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. याशिवाय, यातून निघणारे रेडिएशन मोबाईल फोनपेक्षा खूप कमी असल्याने हे मीटर आरोग्यासाठी हानिकारक नाहीत.

महावितरणच्या सर्व ग्राहकांनी स्मार्ट मीटर बसवून घ्यावेत आणि या आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा. हे मीटर ऊर्जा व्यवस्थापनात क्रांती घडवतील सोबतच वीज चोरीला आळा घालून वितरण गळती कमी करण्यास मदत करतील. स्मार्ट मीटर हे वीज वितरण प्रणालीला आधुनिक आणि कार्यक्षम बनवण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. या तंत्रज्ञानाचा पुरेपूर फायदा घेऊन ग्राहक आपले वीज बिल कमी करू शकतात, त्यामुळे कुठल्याही अफ़वांना बळी न पडता वीज ग्राहकांनी टीओडी मीटर बसविण्याच्या कामी महावितरण आणि संबंधित एजन्सीला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.