०३ नग भरमार व ०१ नग बंदुकीचे बॅरेल केले दामरंचा पोलीसांच्या स्वाधीन

नक्षल सप्ताहादरम्यान अतिदुर्गम दामरंचा येथील नागरिकांनी माओवाद्यांच्या भीतीला झुगारत भरमार बंदूका केल्या पोलीसांच्या स्वाधीन

एकूण ०३ नग भरमार व ०१ नग बंदुकीचे बॅरेल केले दामरंचा पोलीसांच्या स्वाधीन

नागरी कृती उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीचे फलीत; नागरिकांचा पोलीस दलाप्रति विश्वास होतो आहे दृढ

दिनांक २८ जूलै ते ०३ ऑगस्ट दरम्यान माओवाद्यांकडून राबविल्या जाणाऱ्या नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश यांचे नेतृत्वात माओवाद विरोधी अभियान तीव्र करण्यात आले असून सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकें यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विशेष बाब म्हणजे उपविभाग जिमलगट्टा अंतर्गत येणाऱ्या अतिदुर्गम उपपोस्टे दामरंचा हद्दीतील नागरिकांनी पोलीस दलाप्रति विश्वास दाखवित माओवाद्यांच्या सप्ताहादरम्यान एकूण ०३ नग भरमार बंदूका व ०१ नग बंदुकीचे बॅरेल पोलीसांच्या स्वाधीन केले आहे.

गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जंगलक्षेत्र असल्यामूळे येथील दुर्गम अतिदुर्गम भागातील सामान्य नागरिक आपल्या पारंपारिक शेती व्यवसायासोबतच शिकार करुन उदरनिर्वाह करीत असत. शिकार करण्यासाठी तसेच वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी अनेक सामान्य नागरिक बंदूका बाळगत असत. अशा प्रकारच्या वडीलोपार्जित बंदूका व शस्त्रे गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांकडे उपलब्ध आहेत. दुर्गम अतिदुर्गम भागात माओवादी याच बाबींचा फायदा घेऊन, सर्वसामान्य जनतेला माओवादी चळवळीत समाविष्ट करण्याचा प्रयत्न करत असतात. याकरीता पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या संकल्पनेतून अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) श्री. सत्य साई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक गडचिरोली (प्रशासन) श्री. गोकुल राज जी. तसेच सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली नागरिकांनी स्वतःजवळ बाळगलेल्या बंदूका स्वेच्छेने गडचिरोली पोलीस दलाकडे स्वाधिन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. गडचिरोली पोलीस दलाच्या याच आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत माओवाद्यांच्या सप्ताहाला न जुमानता उपविभाग जिमलगट्टा अंतर्गत येणाऱ्या उपपोस्टे दामरंचा हद्दीतील नागरिकांनी ०३ नग बंदूका व ०१ नग बंदुकीचे बॅरेल गडचिरोली पोलीसांच्या स्वाधीन केले आहे. उपपोस्टे दामरंचा येथील प्रभारी अधिकारी पोउपनि. पृथ्वीराज बाराते, पोउपनि. अनिकेत संकपाळ व अंमलदार यांनी राबविलेल्या प्रभावी नागरीकृती उपक्रमांमूळे दामरंचा हद्दीतील नागरीक माओवादाच्या प्रभावाला झुगारत मुख्य प्रवाहामध्ये सामिल होताना दिसून येत आहेत. तसेच सन २०२२ मध्ये एकूण ७३, सन २०२३ मध्ये ४६ व मागील वर्षी २०२४ मध्ये एकूण २६ भरमार बंदूका जिल्ह्यातील नागरिकांनी गडचिरोली पोलीस दलासमक्ष स्वाधीन केलेल्या होत्या.

मागील तीन वर्षात इतक्या मोठ्या प्रमाणात भरमार बंदूका जिल्ह्यातील नागरिकांनी पोलीस दलाच्या स्वाधीन केल्या आहेत, हे पाहता येथील नागरिकांच्या मनात गडचिरोली पोलीस दलाप्रति विश्वास दृढ होताना दिसून येत आहे. यासोबतच गडचिरोली पोलीस दलाच्या नागरीकृती उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीमूळे जिल्ह्यातील नागरिक आता माओवादाच्या भयापासून मूक्त होताना दिसून येत आहे. याचेच उदाहरण म्हणजे उपविभाग कुरखेडा अंतर्गत येणारे कोरची येथील बाजारपेठ माओवाद्यांच्या हिंसक कारवायांमूळे जवळपास मागील २० वर्षांपासून नक्षल सप्ताहादरम्यान बंद ठेवण्यात येत होती. मात्र अनेक वर्षानंतर यावर्षी कोरची येथील व्यापारी आणि नागरिकांनी माओवाद्यांची दहशत झुगारुन यावर्षी नक्षल सप्ताहादरम्यान देखील बाजारपेठ सुरळीतपणे चालू ठेवली आहे. नक्षल सप्ताहादरम्यान नागरिकांनी दाखविलेल्या विश्वास आणि साहसाबद्दल पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांनी नागरिकांचे अभिनंदन केले आहे. तसेच जनतेच्या संरक्षणासाठी गडचिरोली पोलीस दल नेहमीच सतर्क असल्याबाबत अधोरेखित केले आहे.