‘मैत्री’ कडून उद्योजकांना मोफत शासकीय मार्गदर्शन सेवा

 ‘मैत्री’ कडून उद्योजकांना मोफत शासकीय मार्गदर्शन सेवा

चंद्रपूर, दि. 1 : राज्यातील नवउद्योजक, लघु व मध्यम उद्योग तसेच निर्यात क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यावसायिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा, उद्योग स्थापनेसाठी आवश्यक मार्गदर्शन सहज उपलब्ध व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाने ‘मैत्री’ या विशेष कक्षाची स्थापना केली आहे.

या कक्षामार्फत एक मोफत कॉल सेंटर सेवा कार्यरत असून या सुविधेद्वारे नवोदित आणि सध्या कार्यरत असलेल्या उद्योजकांना विविध विषयांवर मार्गदर्शन मिळू शकते. यात महाराष्ट्रात नवीन उद्योग सुरू करण्याची प्रक्रिया, उद्योगासाठी लागणारे परवाने, लायसन्स, नाहरकत प्रमाणपत्र कसे मिळवावेत, विविध शासकीय योजनांतर्गत अनुदान, सवलती व प्रोत्साहन, चालू उद्योगांना येणाऱ्या अडचणींबाबत सल्ला व मदत, उत्पादनांची निर्यात करण्यासंबंधी माहिती, निर्यातदारांसाठी शासनाच्या सवलती व विशेष योजना आदींचा समावेश आहे.

उद्योजक व इच्छुक व्यावसायिकांनी येथे करावा संपर्क : टोल-फ्री क्रमांक 1800 233 2033, मुंबई कार्यालय क्रमांक 022 22622322 / 022 22622361. (कार्यालयीन दिवशी सकाळी 10 ते संध्याकाळी 5.30 पर्यंत)

जिल्ह्यातील सर्व उद्योजक, उद्योग संघटना, शैक्षणिक संस्था, स्टार्टअप्स व स्थानिक तरुण व्यावसायिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र चंद्रपूर यांच्या वतीने करण्यात येत आहे.