गडचिरोली पोलीसांनी केला अवैध दारू व चारचाकी वाहनासह एकूण ६७,२०,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त

गडचिरोली पोलीसांनी केला अवैध दारू व चारचाकी वाहनासह एकूण ६७,२०,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त

गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी असताना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. त्याविरुध्द पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी अवैध दारु विक्री करणाऱ्यांवर प्रभावीपणे कायदेशिर कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत. यावरुन काल दिनांक २९/०७/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली येथील पथकाने सापळा रचून अवैध दारुची वाहतूक करणाऱ्या आरोपींविरुद्ध कारवाई केलेली आहे.

सविस्तर वृत्त असे आहे की, काल दिनांक २९ जुलै २०२५ रोजी इसम नामे जितेंद्र शंकर लोहार, हल्ली मु. येंगलखेडा, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली हा आपला साथीदार नामे रोशन दुग्गा, रा. चिचेवाडा, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली याच्या मदतीने चारचाकी वाहन क्र. एमएच-१८-बी.झेड-७४७७ मधून पुराडा मार्गे अवैधरित्या देशी विदेशी दारुची वाहतूक करणार आहे, अशी गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली यांना गोपनिय बातमीदाराकडून मिळाली. यावरुन पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोलीचे पोलीस पथक मौजा हेटीनगर, पुराडा चौक करीता रवाना करण्यात आले होते. सदर ठिकाणी पोलीस पथकाने सापळा रचला असता वरील वर्णनाप्रमाणे असलेले संशयीत चारचाकी वाहन भरधाव वेगाने येताना दिसून आल्यावर पोलीसांनी सदर वाहनाला थांबण्याचा इशारा करुन वाहनास रस्त्याच्या कडेला थांबविले. त्यानंतर पोलीस पथकाने सदर वाहनातील चालक व इतर व्यक्तीस त्यांचे नाव विचारले असता त्यांनी आपले नाव जितेंद्र शंकर लोहार, ह.मु. येंगलखेडा, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली व रोशन दुग्गा, रा. चिचेवाडा, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली असे सांगितले.

त्यानंतर वाहन चालकास वाहन अडविण्याचे कारण सांगून पोलीस पथकाने पंचांसमक्ष सदर वाहनाची तपासणी केली असता, वाहनात मोठ्या प्रमाणावर अवैध देशी दारुचा मुद्देमाल मिळून आला. यावरुन वाहनातील १) ८५ पेट्या टैंगो पंच देशी दारुचे बॉक्स, किंमत अंदाजे ६,८०,०००/- रुपये २) ५६५ पेट्या रॉकेट देशी दारुचे बॉक्स, किंमत अंदाजे ४५,२०,०००/- रुपये ३) चारचाकी आयशर वाहन क्र. एमएच-१८-बी.झेड-७४७७ किंमत अंदाजे १५,००,०००/- रुपये, ४) दोन जुने वापरते मोबाईल किंमत अंदाजे २०,०००/- रुपये असा एकुण ६७,२०,०००/- (अक्षरी सदुसष्ठ लाख वीस हजार रुपये) रुपयांचा मुद्देमाल कारवाई करुन जप्त करण्यात आला. यावरुन संबंधीत घटनेच्या अनुषंगाने पोस्टे पुराडा येथे अप. क्र. ७६/२०२५ कलम ६५ (अ), ९८ (२), ८३ महा. दा. का. अन्वये आरोपी नामे १) जितेंद्र शंकर लोहार, ह.मु. येंगलखेडा, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली, मुळ पत्ता रा. शिरुड. ता. व जि. धुळे व २) रोशन दुग्गा, रा. चिचेवाडा, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली यास सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि /रविंद्र म्हैसकर, पोस्टे पुराडा हे करीत आहेत.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक, गडचिरोली (प्रशासन) श्री. गोकुल राज जी. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा श्री. रविंद्र भोसले यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक श्री. अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात स.पो.नि. समाधान दौड, पोस्टे पुराडाचे सपोनि. रविंद्र म्हैसकर स्थागुशाचे पोहवा/सुधाकर दंडीकवार, पोअं/प्रशांत गरफडे, रोहित गोंगले, चापोअं/माणिक निसार यांनी पार पाडली.