चंद्रपूर मनपाच्या 45 इमारतींवर रूफटॉप सोलर प्रणाली कार्यान्वित
ऊर्जा बचत व पर्यावरणपूरक उपाययोजनांकडे मनपाची वाटचाल
चंद्रपूर,16 जुलै: चंद्रपूर महानगरपालिकेच्या शाळा आणि विविध कार्यालयीन इमारतींसह एकूण 45 इमारतींवर रूफटॉप सोलर प्रकल्प यशस्वीरित्या कार्यान्वित करण्यात आले आहेत. विद्युत विभागाच्या पुढाकाराने ही प्रणाली सुरू करण्यात आली असून, 399 किलोवॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पांद्वारे महापालिकेला वीज खर्चात लक्षणीय बचत होणार आहे. यामुळे पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापर सुनिश्चित होत असून, शाश्वत विकासाच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे.
महापालिकेची मुख्य इमारत, झोन कार्यालये, करसंकलन केंद्रे, संगणक कक्ष तसेच नागरिकांना सेवा पुरवणारी यंत्रणा – जसे की सीसीटीव्ही, वायफाय झोन, डिजिटल साईनबोर्ड, स्मार्ट मीटरिंग इत्यादीसाठी आवश्यक वीज आता स्वच्छ सौर ऊर्जेतून मिळत आहे. अमृत 2.0 योजनेअंतर्गत, तुकूम येथील जलशुद्धीकरण केंद्रावर 600 किलोवॅट क्षमतेचा सौर प्रकल्प उभारण्याचे काम देखील प्रगतीपथावर आहे. या केंद्रामार्फत शहरासाठी पिण्याचे पाणी शुद्ध करून घरोघरी पोहोचवले जाते. वीजेच्या प्रचंड गरजेमुळे हे केंद्र अखंड सुरू असते, आणि यामुळे सौर ऊर्जेचा वापर अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.
भविष्यात मनपाच्या इतर इमारतींवरही अशाच सौर ऊर्जा प्रणाली उभारण्याची योजना हाती घेण्यात येणार आहे. सौर ऊर्जा ही स्वच्छ, हरित आणि पर्यावरणपूरक ऊर्जा असून, ती कार्बन उत्सर्जन कमी करते आणि ऊर्जा सुरक्षेत भर घालते. आयुक्त विपीन पालीवाल यांच्या निर्देशानुसार महानगरपालिका हरित ऊर्जा उपक्रमांची कास धरून इतरही उपाययोजनांची अंमलबजावणी करत आहे.
“सौर प्रणालीमुळे कार्यालयीन यंत्रणा अखंड कार्यरत राहतात आणि महापालिकेचा वीज खर्च मोठ्या प्रमाणात कमी होतो आहे. सध्या 399 किलोवॅट क्षमतेचे सौर प्रकल्प सुरू असून, त्यातून नेमकी किती बचत होते हे लवकरच विश्लेषण करून जाहीर करण्यात येईल” – प्रगती भुरे,उपअभियंता,विद्युत विभाग,चंद्रपूर महानगरपालिका