गडचिरोली पोलीस दलाच्या प्रयत्नांनी स्वातंत्र्यानंतर प्रथमच अतिदुर्गम मरकणार ते अहेरी बस सेवेला सुरुवात

गडचिरोली पोलीस दलाच्या प्रयत्नांनी स्वातंत्र्यानंतर प्रथमच अतिदुर्गम मरकणार ते अहेरी बस सेवेला सुरुवात

नागरिकांनी राष्ट्रध्वज फडकवत जल्लोषात केले बसचे स्वागत

मरकणार, फुलनार, कोपर्शी, पोयारकोटी सारख्या अनेक अतिदुर्गम गावांना मिळणार बस सेवेचा लाभ

गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहुल व माओवादग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील दुर्गम-अतिदुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी प्रवासाचे साधन उपलब्ध नसल्याने त्यांना पायपीट करत प्रवास करावा लागत असतो. अशा दुर्गम भागातील नागरिकांचे जगणे सुसह्य व्हावे यासाठी गडचिरोली पोलीस दलाकडून विविध उपक्रम राबविले जात असतात. याच वर्षी ०१ जानेवारी २०२५ रोजी गट्टा-गर्देवाडा-वांगेतुरी बस सेवा तसेच दिनांक २७ एप्रिल २०२५ रोजी कटेझरी ते गडचिरोली बस सेवा देखील सुरु करण्यात आली असून दुर्गम भागात मागील पाच वर्षांमध्ये ४२०.९५ कि.मी. लांबीच्या एकूण २० रस्त्यांसोबतच एकूण ६० पुलांचे बांधकाम पोलीस संरक्षणात पूर्ण करुन घेण्यात आले आहे. याप्रमाणेच भामरागड उपविभागातील छत्तीसगड सिमेपासून अवघ्या ०६ किमी. अंतरावर असलेल्या अतिदुर्गम मौजा मरकणार येथील नागरिकांना प्रवासाचे साधन उपलब्ध होऊन त्यांना तहसिल किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी सहज प्रवास करता यावा यासाठी आज दिनांक १६/०७/२०२५ रोजी गडचिरोली पोलीस दलाच्या प्रयत्नाने व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, गडचिरोली यांच्या सहकार्याने मौजा मरकणार ते अहेरी बस सेवेला स्वातंत्र्यानंतर प्रथमच सुरुवात करण्यात आली.

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड उपविभागातील अबुझमाडच्या पायथ्याशी असलेल्या अतिदुर्गम मरकणार या गावात स्वातंत्र्यानंतर प्रथमच बस आल्यामुळे भागातील नागरिकांनी राष्ट्रध्वज फडकवत जल्लोषात बसचे स्वागत केले आहे. मौजा मरकणार गावचे गाव पाटील श्री. झुरु मालु मट्टामी यांनी सदर बस सेवेचे उ‌द्घाटन केले तसेच यावेळी सिआरपीएफ ३७ बटा. जी कंपनीचे असिस्टंट कमांडंट श्री. अविनाश चौधरी तसेच पोलीस स्टेशन, कोठीचे प्रभारी अधिकारी पोउपनि. दिलीप गवळी यांनी हिखा झेंडा दाखवून बस मार्गस्थ केली. यावेळी पोलीस दलामार्फत उपस्थित नागरिकांमध्ये मिठाईचे वाटप करुन आनंद व्यक्त करण्यात आला. गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने राबविण्यात आलेल्या नागरी कृती उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे मौजा मरकणार गावातील नागरिकांनी एकमताने दिनांक ०९ फेब्रुवारी २०२५ रोजी नक्षल गावबंदी ठराव पारीत करुन माओवाद्यांना कोणत्याही प्रकारची मदत करणार नाही असे घोषित केले होते. या अतिदुर्गम भागातील नागरिकांचा विकास होण्यासाठी गतवर्षी पोलीस संरक्षणामध्ये कोठी ते मरकणार रस्ता तयार करण्यात आला असून मरकणार ते मुरुमभुशी रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. या भागातील नागरिकांच्या सुविधेसाठी मरकणार गावात एअरटेल टॉवरचे बांधकाम करण्यात आले आहे. या भागातील नागरिकांसाठी यापुर्वी कोणत्याही प्रकारची प्रवासाची सुविधा उपलब्ध नसल्यामूळे मरकणार तसेच आसपासच्या गावातील नागरिकांना कोठीपर्यंत पायी जाऊन बससेवेचा लाभ घ्यावा लागत असे. या भागात बससेवा सुरु झाल्यामुळे याचा लाभ मरकणार, मुरुमभुशी, फुलनार, कोपर्शी, पोयारकोठी, गुंडूरवाही या गावातील जवळपास १२०० हुन अधिक नागरिक, रुग्ण, विद्यार्थी, प्रवासी यांना होणार आहे. सदर मार्गावरील एस.टी बसच्या सुविधेमुळे गावकऱ्यांना वर्षभर सहज प्रवास करता येईल, तसेच पोलीस व जनता यांचे संबंध आणखी मजबूत होण्यास मदत होईल.

पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या संकल्पनेतून अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी (प्राणहिता) श्री. सत्य साई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक, गडचिरोली (प्रशासन) श्री. गोकुळ राज जी. तसेच पोलीस उप-अधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोजे, उपविभागीय पोलीस अधिकारी, भामरागड श्री. अमर मोहिते, यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे कोठी येथील पोउपनि. दिलीप गवळी व सिआरपीएफ आणि जिल्हा पोलीस दलाचे अधिकारी व अंमलदार यांच्या प्रयत्नांनी सदर उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.