जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन Ø 21 जुलै 2025 रोजी महिलांसाठी विशेष संवाद व्यासपीठ

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन

Ø 21 जुलै 2025 रोजी महिलांसाठी विशेष संवाद व्यासपीठ

चंद्रपूर, दि. 14 जुलै : समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध व्हावे, तसेच त्यांच्या तक्रारी व अडचणींवर शासकीय यंत्रणेमार्फत प्रभावी मार्गाने कार्यवाही व्हावी, यासाठी महिला व बाल विकास विभागामार्फत दरमहा “महिला लोकशाही दिन” राबविण्यात येतो.

सदर उपक्रमांतर्गत, ज्या महिलांना व्यक्तिगत स्वरूपाच्या तक्रारी, अडचणी किंवा निवेदने आहेत, त्यांनी महिला लोकशाही दिनाच्या 15 दिवसांपूर्वी आपली तक्रार दोन प्रतींत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, चंद्रपूर यांच्या कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. प्राप्त तक्रारी संबंधित विभागांकडे कार्यवाहीसाठी पाठवून त्याचा योग्य निपटारा करण्यात येतो.

त्यानुसार, जुलै 2025 महिन्यातील जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचा कार्यक्रम दिनांक 21 जुलै 2025 रोजी सोमवार, दुपारी 1.00 वाजता, मा. निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी, चंद्रपूर यांच्या दालनात, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. तसेच तालुकास्तरावरील महिला लोकशाही दिनाचे आयोजन महिन्याच्या चौथ्या सोमवार रोजी करण्यात येणार आहे.

सदर उपक्रमामार्फत महिलांना त्यांचे प्रश्न शासनदरबारी मांडण्याची संधी प्राप्त होत असून, समस्याग्रस्त व पीडित महिलांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महिला व बाल विकास विभाग, चंद्रपूर यांच्या वतीने करण्यात येत आहे.