चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाळी येथील पॉवर स्टेशनच्या पाईपलाईनमुळे बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे फेर सर्वेक्षण करणार – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन
मुंबई, दि. ११ : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाळी येथील पॉवर स्टेशनसाठी धारिवाल कंपनीने पाईपलाईन मंजूर मार्गाने न टाकता शेतजमिनीतून टाकल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याचे आढळून आले आहे. याबदल्यात शेतकऱ्यांना अतिशय कमी मोबदला मिळाल्याप्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत फेर चौकशी करण्याचे निर्देश देण्यात येतील, असे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत सांगितले.
सदस्य सुधाकर आडबाले यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना मंत्री श्री. महाजन बोलत होते. या चर्चेत सदस्य भाई जगताप यांनी सहभाग घेतला.
मंत्री श्री. महाजन म्हणाले, मे. धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीच्या चंद्रपूर जिल्ह्यातील ६०० मेगावॅट क्षमतेच्या विद्युत निर्मिती प्रकल्पाकरिता १८.२७ दलघमी इतक्या पाण्याची वर्धा नदीतून वार्षिक उचल करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. धारिवाल कंपनीने पाईपलाईन मंजूर मार्गाने न टाकता शेतजमिनीतून टाकल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याचे आढळून आल्याने जिल्हाधिकारी चंद्रपूर कार्यालयाकडून चौकशी केल्यानंतर नियमाप्रमाणे पाईपलाईन टाकण्याबाबत तसेच शेतकऱ्यांना नुकसानीचा मोबदला देण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे. तथापि शेतकऱ्यांना देऊ केलेला मोबदला अतिशय कमी दिसून येत असल्याने याचे फेर सर्वेक्षण करण्याबाबत जिल्हाधिकारी यांना आदेश दिले जातील, असेही मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी सांगितले.