मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष ऐतिहासिक भोसले तलवार लवकरच महाराष्ट्रात – सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार

मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष ऐतिहासिक भोसले तलवार लवकरच महाराष्ट्रात – सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार

मुंबई, दि. 7 :- मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष असलेली नागपूरच्या भोसले घराण्याशी संबंधित असली ऐतिहासिक तलवार महाराष्ट्रात परत आणली जात असून ही संपूर्ण राज्यासाठी अभिमानास्पद बाब असल्याचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत महाराष्ट्र विधानसभा नियम 293 अन्वये मांडलेल्या सत्ताधारी पक्षाच्या प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना सांगितले.

मंत्री श्री. शेलार यांनी सांगितले, इतिहासातील अत्यंत मोलाच्या वस्तूची पुनर्प्राप्ती करून मराठ्यांच्या पराक्रमाची आठवण जागवली जात आहे. लंडनमध्ये लिलावात नागपूरच्या भोसले राज घराण्याशी संबंधित ऐतिहासिक तलवार महाराष्ट्रात परत आणण्याचा उपक्रम यशस्वी ठरला आहे. ही तलवार छत्रपती शाहू महाराजांच्या काळात रघुजी भोसले (प्रथम) यांनी बंगाल व ओडिशापर्यंत लढलेल्या लष्करी मोहिमांमध्ये वापरलेली होती.

सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. शेलार यांनी सांगितले, लंडनमधील एका कंपनीच्या लिलावात ही तलवार विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या प्रयत्नातून आणि विशेष पुढाकारातून जवळपास ६९ लाख ९४ हजार ४३७ रुपयांना ही तलवार विकत घेण्यात आली. या तलवारीची मुठ सोन्याची आहे. या तलवारीवर रघुजी भोसले यांचे नाव कोरलेले आहे. या ऐतिहासिक तलवारीचे कस्टम क्लिअरन्स व पॅकिंगचे काम पूर्ण होऊन १५ ऑगस्टपूर्वी ही तलवार महाराष्ट्रात आणली जाईल,असेही त्यांनी यावेळी सांगितले.

हरिश्चंद्रगड येथे असणारे मंदिर केंद्र शासनाच्या अखत्यारीत ते संरक्षित असल्याचे सांगून मंत्री श्री. शेलार यांनी सांगितले. विश्रामगड हा असंरक्षित किल्ला असून या किल्ल्याच्या डागडुजीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी राखीव ठेवला जाईल असे त्यांनी सांगितले.

मंत्री श्री. शेलार यांनी सांगितले, राज्य शासनाकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करत कृत्रिम बुद्धिमत्ताक्षेत्रातही (AI) भरीव पावले उचलली जात आहेत. Google सोबत करार करून विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. राज शासनाने मेटा सोबतही सामंजस्य करार केला असून त्याद्वारे शासकीय सेवा WhatsApp वर उपलब्ध करून देण्याचा उपक्रमही राबवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.