मोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी मनपा घेणार धडक मोहीम हाती
चंद्रपूर 4 जुलै – चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची धडक मोहीम हाती घेण्यात येणार असुन जनावरांना मोकाट सोडुन वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या जनावरांच्या मालकांवर कारवाई करण्यात येणार आहे.
शहरातील बंगाली कॅम्प परिसरात मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरांचा वावर असल्याने नागरिकांना त्रास होत असल्याबाबत तसेच अपघात होण्याची शक्यता असल्याबाबत नागरिकांच्या तक्रारी मनपास प्राप्त होत आहेत. त्याचप्रमाणे जिल्हा शांतता समितीव्दारादेखील सदर प्रकारची मोकाट जनावरांचे त्रासाबाबत तक्रार प्राप्त झालेली आहे.त्यानुसार मनपाद्वारे मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
शहरातील मुख्य तसेच इतर मार्गांवर, रस्त्यांवर मोकाट जनावरे ठाण मांडून बसून राहात असल्याने वाहनधारकांचा अपघात होण्याची शक्यता अधिक असते. याबाबत मनपातर्फे यापुर्वीही कारवाई करून जनावरांच्या मालकांना समज देण्यात आली आहे.समज दिल्यानंतर काही काळ ते आपल्या जनावरांवर लक्ष देऊन ते रस्त्यावर येणार नाही याची काळजी घेतात,मात्र त्यानंतर पुन्हा जनावरांना मोकाट सोडुन देण्यात येते असे निदर्शनास आले होते,यापुर्वी अश्या 33 मोकाट जनावरांच्या मालकांवर पोलिसात तक्रार करून गुन्हा नोंद करण्यात आली होती
बंगाली कॅम्प परिसरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याकरिता प्रथमतः सदर परिसरामध्ये मोकाट जनावरांवर कार्यवाहीबाबत तसेच जे नागरिक त्यांची जनावरे रस्त्यावर मोकाट सोडतात त्यांना सुचित करण्याच्या दृष्टीकोनातुन वृत्तपत्राच्या माध्यमातुन तसेच ऑटोव्दारे सुचना देण्यात येत आहेत. त्यानंतर संबंधितांना कळविण्यात येऊन परिस्थितीत सुधार न झाल्यास कारवाई करण्यात येणार आहे.