गडचिरोली पोलीस दलातील शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी ‘शहीद सैनिक आश्रित कुटुंब आरोग्य कल्याण योजनेचा’ लाभ सुरु

गडचिरोली पोलीस दलातील शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी ‘शहीद सैनिक आश्रित कुटुंब आरोग्य कल्याण योजनेचा’ लाभ सुरु

गडचिरोली पोलीस दल आणि सहयोग हॉस्पिटल, गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने राबविली जाणार योजना

गडचिरोली जिल्हा हा माओवाददृष्ट्या अति-संवेदनशिल असून, जिल्ह्यामध्ये माओवाद्यांच्या हिंसक कारवायांमध्ये सुरक्षा दलाचे आजपावेतो एकूण २१३ जवान शहीद झालेले आहेत. सर्व शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या कल्याणाकरिता गडचिरोली पोलीस दलाकडून विविध उपक्रम राबविले जात असतात. याचाच एक भाग म्हणून वीर मरण आलेल्या शहीद कुटुंबाबद्दल कृतज्ञता तसेच आदर व्यक्त करण्याच्या दृष्टीकोनातून शहीद जवानांच्या कुटुंबातील सदस्यांकरिता गडचिरोली पोलीस दल व सहयोग हॉस्पिटल, गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक ३० मे २०२५ रोजी पासून ‘शहीद सैनिक आश्रित कुटुंब आरोग्य कल्याण योजनेचा’ लाभ सुरु करण्यात आलेला आहे.

पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली सदर योजना गडचिरोली जिल्ह्यात राबविली जाणार आहे. सहयोग हॉस्पिटल, गोंदियाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक श्री. जयेशचंद्र रमण रमादे संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या शहीद सैनिक आश्रित कुटुंब आरोग्य कल्याण योजनेच्या माध्यमातून गडचिरोली पोलीस दलातील शहीद जवानांच्या कुटुंबातील आई-वडील, पत्नी व १८ वर्ष वयाखालील पाल्य यांच्याकरिता आपत्कालीन सुविधा, ओपीडी, आयपीडी, शस्त्रक्रिया तसेच रुग्णालयात उपलब्ध असलेल्या सर्व वैद्यकिय सुविधांचा लाभ पूर्णपणे मोफत पुरविला जाणार आहेत. सदर योजनेच्या माध्यमातून शहीद जवानांच्या कुटुंबियांना विविध अत्यावश्यक तसेच अत्याधूनिक वैद्यकिय सुविधांचा लाभमिळणार आहे. रुग्णालयातील कार्डीओलॉजी, न्यूरोलॉजी, पॅथॉलॉजी, रेडीओलॉजी यासारख्या विविध अत्याधुनिक विभागांद्वारे शहीद जवानांच्या कुटुंबातील अबालवृद्धांना प्राथमिक वैद्यकिय चाचणीपासून ते अत्याधूनिक शस्त्रक्रियेपर्यंतच्या सर्व सुविधा पुरविल्या जाणार असल्याने त्यांचे जीवनमान सुसह्य होण्यास मदत होणार आहे.

पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. सत्य साई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली व सहयोग हॉस्पिटल, गोंदिया यांच्या संपूर्ण टीमच्या सहकार्याने जिल्हाभरातील शहीदांच्या कुटुंबियांसाठी सदर योजना कार्यान्वित केली जाणार आहे. या प्रसंगी पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी शहीद जवानांच्या कुटुंबियांना सदर योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.