दोन प्राधिकृत स्वस्त धान्य दुकानावर अनियमिततेच्या कारणांमुळे रद्द

दोन प्राधिकृत स्वस्त धान्य दुकानावर अनियमिततेच्या कारणांमुळे रद्द

भंडारा,दि.03 : शिधापत्रिकाधारकांना शिधापत्रिकेवरील अनुज्ञेय धान्य योग्य प्रमाणात वितरण न करणे, शिधापत्रिका धारकांना दिलेल्या धान्यांची पावती न देणे, पुर्णवेळ दुकान सुरु न ठेवणे, दुकानाचे अभिलेख अदयावत न ठेवणे, दुकानातील धान्य साठयाची अफरातफर करणे या स्वरुपाच्या अनियमीतता आढळुन आल्याने दोन प्राधिकृत स्वस्त धान्य दुकाने अनियमिततेच्या कारणांमुळे रद्द करण्याची कारवाई जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांनी केली.

 

पुरवठा विभागाने दिलेल्या प्रेसनोटनुसार भंडारा जिल्हा अंतर्गत भंडारा तालुक्यामधील मौजा गराडा येथील श्रीमती मंजुषा मनोज जगनाडे व मौजा-नरकेशरी वार्ड, भंडारा येथील श्रीमती श्वेता सेलोकर यांचे नावाने मंजुर असलेले प्राधिकृत स्वस्त धान्य दुकाने आदेशान्वये रद्द करण्यात आलेत.

 

या दोन्ही दुकानात तसेच भंडारा जिल्हयातील सर्व शिधापत्रिकाधारकांना जिल्हा पुरवठा विभाग, भंडारा मार्फत आवाहन करण्यात येते की, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत पात्र प्राधान्य कुटुंबाचे लाभार्थी योजनेतील समाविष्ठ लाभार्थ्यांना प्रती व्यक्ती ५ किलो अन्नधान्य व अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिका धारकांना प्रती शिधापत्रिका ३५ किलो अन्नधान्य मोफत अनुज्ञेय आहे. जे दुकानदार उपरोक्त प्रमाणे शासनाने ठरवुन दिलेल्या प्रमाणानुसार धान्य देत नसतील किंवा इतर काही अनियमीतता करत असतील अश्या दुकानदाराची तक्रार जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे कार्यालय, भंडारा येथे करावी. किंवा ऑनलाईन पद्धतीने www.mahafood.gov.in/pggrams या संकेतस्थळावर अथवा १९६७/१८००२२४९५० या हेल्पलाईन क्रमांकावर करावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांनी कळविले आहे.