धान खरेदी अपहारातील ०२ आरोपी जेरबंद
• तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ, गडचिरोली व तत्कालीन केंद्र
प्रमुख, मार्कंडा (कं), आष्टी यांना अटक
एकुण ६,०२,९३,८४५/- रुपयांचा झाला होता अपहार
शेतकऱ्यांनी पिकविलेल्या शेतमालाला आधारभुत किंमत देण्याकरीता शासन विविध योजना राबवित असतात. राज्य शासनाचा उपक्रम असलेल्या महाराष्ट्र सहकारी आदिवासी विकास महामंडळामार्फत शेतकऱ्यांनी पिकविलेले धान विविध खरेदी केंद्रावर खरेदी केल्या जाते. खरेदी केलेल्या धानाची प्रादेशिक कार्यालय समिती स्तरावर मा. जिल्हाधिकारी यांचे मान्यतेने नेमलेल्या मिलर्सकडुन बँक गॅरंटीच्या प्रमाणात धानाचे वितरण केले जातात. जावक धानाचे वितरण आदेश मिलर्स व खरेदी केंद्रावरील केंद्रप्रमुख यांच्या स्वाक्षरीने वजन पावत्यासह उपप्रादेशिक कार्यालयास सादर केले जातात. मिलर्स उचल केलेल्या धानाची भरडाई करुन तयार होणार तांदुळ जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे अधिनस्त गोदामात जमा करण्यात येतो. जमा केलेल्या तांदळाच्या स्विकृत पावत्या मिलर्सद्वारा प्रादेशिक कार्यालयात सादर करण्यात येतात. परंतू, काही अधिकारी/कर्मचारी यात गैरप्रकार करुन आपले आर्थिक हितसंबंध साधतात.
गडचिरोली जिल्ह्यातील उपप्रादेशिक कार्यालय, घोट अंतर्गत मार्कंडा (कन्सोबा) येथील धान खरेदी केंद्रात खरेदी योजना हंगाम २०२२-२०२३ या दरम्यान अपहार झाल्याच्या तक्रारीवरुन महाराष्ट्र सहकारी आदिवासी विकास महामंडळातर्फे चौकशी करण्यात आली. सदर चौकशित मार्कंडा (कन्सोबा) येथील धान खरेदी केंद्रात खरेदी योजना हंगाम २०२२-२०२३ या दरम्यान एकुण ५९९४७.६० क्विटल धान खरेदी झाली होती. त्यापैकी प्रत्यक्ष ३१५३२.५८ क्विटल धान जावक झालेला आहे. परंतु मिलर्सना दिलेल्या एकुण वितरण आदेशापैकी २८४१५.०२ क्विटल धान प्रति क्विटल २०४०/- रुपये प्रमाणे ५,७९,६६,६४०/- रुपयांचा मिलर्सना प्राप्त झाला नाही, तसेच गोदामात देखील शिल्लक नाही. त्याचप्रमाणे, महामंडळातर्फे पुरविण्यात आलेल्या एकुण बारदाण्यापैकी ७१०३८ नग, प्रति नग ३२.७६/- रुपये प्रमाणे २३,२७, २०४/- रुपयांच्या बारदाण्यांचा असा एकुण ६,०२,९३,८४५/- रुपयांचा अपहार झाल्याचे चौकशीअंती निष्पन्न झाले. याकरीता, तत्कालीन केंद्रप्रमुख, मार्कंडा (कं), आष्टी व्ही.ए.बुलें, विपनन निरीक्षक आर.एस. मडावी, प्रभारी उपप्रादेशिक व्यवस्थापक व्ही.ए. कुंभार, तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक, आ.वि.महा. गडचिरोली जी.आर. कोटलावार असे जबाबदार असल्याचे, प्रभारी प्रादेशिक व्यवस्थापक, म.रा.सह. आदिवासी विकास महामंडळ मर्या. गडचिरोली यांच्या लेखी फिर्यादीवरुन पोलीस स्टेशन आष्टी येथे कलम ४२०, ४०९, ४६५, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल होताच पोलीसांनी तपासाची गती तीव्र करुन आरोपी नामे (१) व्यंकटी अंकलु बुर्ले, वय ४६ वर्षे, व्यवसाय नोकरी (कनिष्ठ सहाय्यक आदिवासी विकास महामंडळ व तत्कालीन केंद्र प्रमुख, मार्कंडा (कं), आष्टी) रा. आष्टी ता. चामोर्शी, जि. गडचिरोली (२) गजानन रमेश कोटलावार, वय ३६ वर्षे, व्यवसाय नोकरी (निलंबित प्रादेशिक व्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ, यवतमाळ व तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ, गडचिरोली) रा. कुंदलवाडी ता. बिलोली जि. नांदेड यांना गडचिरोली पोलीसांनी अटक केले असुन त्यांना मा. न्यायदंडाधिकारी, चामोर्शी यांचेसमक्ष हजर केले असता, त्यांची दिनांक १५/०६/२०२४ रोजी पावेतो पोलीस कोठडी रिमांड मंजुर केलेला आहे. सदर गुन्ह्याचे तपासात राकेश सहदेव मडावी, वय ३४ वर्षे, व्यवसाय नोकरी (प्रतवारीकार आ.वि.म.घोट) यांना ताब्यात घेण्यात आले असुन गुन्ह्यासंबंधाने त्याचेकडे विचारपुस सुरु आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल व मा. अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री. उल्हास भुसारी यांचे नेतृत्वात सपोनि. राहुल आव्हाड, पोउपनि. सरीता मरकाम, पोउपनि. बालाजी सोनुने तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे. सदर कारवाईकरीता पोस्टे आष्टीचे प्रभारी अधिकारी पोनि. विशाल काळे यांचे सहकार्य लाभले.