मतदारांना कोणी प्रलोभन दाखवत असल्यास निरीक्षकांना कळवा –  निवडणूक निरीक्षक विनय सिंग

मतदारांना कोणी प्रलोभन दाखवत असल्यास निरीक्षकांना कळवा

–  निवडणूक निरीक्षक विनय सिंग

  • राजकीय पक्ष व उमेदवारांच्या प्रतिनिधींची आढावा बैठक

भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघासाठी आता एकूण 18 उमेदवार रिंगणात असून कुठेही मतदारांवर प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष दबाव किंवा धमकाविण्याचे प्रकार आढळल्यास त्याची माहिती त्वरीत द्यावी, असे आवाहन सामान्य निवडणूक निरीक्षक विनय सिंग यांनी  केले.

राजकीय पक्ष व उमेदवारांच्या प्रतिनिधींना निवडणूक प्रक्रियेची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात काल  आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी श्री.सिंग बोलत होते. बैठकीला निवडणूक खर्च निरीक्षक हर्ष वर्धन,  जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, गोंदिया जिल्हाधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलिस अधिक्षक लोहित मतानी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रशांत पिसाळ व इतर अधिकारी आणि राजकीय पक्षांचे / उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी श्री. सिंह म्हणाले, जिल्ह्यात किंवा  लोकसभा मतदारसंघात  मतदारांना प्रलोभन दाखवणे किंवा आमिष दाखवणे असे प्रकार होत असल्यास मला वैयक्तिक रित्या कळवावे. तसेच त्याची माहिती जिल्हा प्रशासनाला त्वरित कळवावी. जेणेकरून अशा क्षेत्रात पोलिसांसह अतिरिक्त मनुष्यबळाचे व्यवस्थापन करता येईल.

निवडणुकीच्या काळात नागरिकांना किंवा अन्य कोणालाही तक्रार करावयाची असल्यास सी-व्हीजील ॲपचा उपयोग करावा. या ॲपवर तक्रार आणि फोटो अपलोड केल्यास 100 मिनिटांमध्ये त्याचे निराकरण करता येते. निवडणुकीच्या संदर्भातील ऑनलाईन परवानगी करीता ‘सुविधा’ ॲप विकसीत करण्यात आले आहे. उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी सुविधा ॲपचा वापर करावा. ऑफलाईन परवानगीकरीता ‘एक खिडकी’ योजनासुध्दा उपलब्ध आहे, असे सामान्य निवडणूक निरीक्षक श्री. सिंग  यांनी सांगितले.

तर खर्च निरीक्षक श्री. हर्षवर्धन म्हणाले, पूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणताही उमेदवार, राजकीय पक्ष किंवा संघटन 10 हजार रुपयांपेक्षा जास्त रोख रकमेचा खर्च करू शकत नाही. यापेक्षा जास्त खर्च करावयाचा असल्यास ऑनलाईन किंवा धनादेशाद्वारे करता येईल. तसेच उमेदवारांनी आपल्या खर्चाच्या नोंदवह्या अतिशय अचूक भराव्यात. खर्चाच्या नोंदवहीची पडताळणी तीन वेळा करणे आवश्यक असून नोंदवहीत बाब निहाय खर्च रोज नमुद करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी निवडणुकीदरम्यानच्या आचारसंहिता भंगाच्या विषयी करावयाच्या कारवाईची माहिती नोडल अधिकारी रणदिवे यांनी दिली. तर खर्च विषय बाबत नियम कॅफ़ो संतोष सोनी यांनी सांगितले. उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांनी कायदा व सुव्यवस्थेबाबतचे नियम राजकीय प्रतिनिधींना सांगितले. पोस्टल बॅलेट आणि दिव्यांग तसेच ८५ वर्षांवरील मतदारासंबंधी करावे याची कार्यवाही रोहिणी पाठराबे यांनी सांगितली.

सर्व सोळा नोडल अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संबंधित विषयाची माहिती उमेदवार व प्रतिनिधींना दिली.  जिल्हाधिकारी श्री. कुंभेजकर म्हणाले, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया नि:ष्पक्ष आणि मुक्त वातावरणात पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सर्व राजकीय पक्ष, उमेदवारांचे सहकार्य आवश्यक आहे. आदर्श आचारसंहितेच्या काळात ‘काय करावे’ किंवा ‘काय करू नये’, याबाबतही त्यांनी माहिती दिली. सोबतच 27 मार्च रोजी अंतिम झालेली मतदार यादी, 85 वर्षावरील व दिव्यांग मतदारांना गृहमतदानाची सुविधा, टपाली मतदान, निवडणुकीसाठी पोलिस कर्मचा-यांची तैनाती व इतर मनुष्यबळ, जिल्हास्तरावर व विधानसभा मतदारसंघ स्तरावर मिळणा-या परवानग्या, ईव्हीएम व्हीव्हीपॅट सुरक्षा व्यवस्थापन, स्ट्राँग रुम, पेडन्यूज व जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण, उमेदवारांच्या खर्चाचे योग्य व्यवस्थापन आदींबाबत उमेदवारांच्या प्रतिनिधींना अवगत केले.

असे आहेत संपर्क क्रमांक :

1.मतदार मदत केंद्र / नियंत्रण कक्ष – 1950 (टोल फ्री)

2.आदर्श आचार संहिता कक्ष – 07184-299243,299274

3.सी-व्हीजील / ई.एस.एम.एस – ॲपद्वारे