धान खरेदी चुकारेसंदर्भात खरेदी केंद्रावर बँक मॉडीफिकेशनची सुविधा/चुकारे प्राप्त न झालेल्या शेतक-यांनी त्वरीत संपर्क करण्याचे आवाहन

धान खरेदी चुकारेसंदर्भात खरेदी केंद्रावर बँक मॉडीफिकेशनची सुविधा

चुकारे प्राप्त न झालेल्या शेतक-यांनी त्वरीत संपर्क करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 15 : धान खरेदी  नंतर तांत्रिक कारणामुळे चुकारे प्राप्त न झालेल्या शेतक-यांसाठी खरेदी  केंद्रावर बँक मॉडीफिकेशनची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यासंदर्भात संबंधित शेतक-यांनी त्वरीत धान खरेदी केंद्रावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी व्ही. एस. तिवाडे यांनी केले आहे.

हंगाम 2023-24 मधील आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यात धान व भरडधान्य खरेदी करण्यात आले आहे. धान व भरडधान्य खरेदी करण्यात आलेल्या शेतक-यांचे चुकारे ऑनलाईन पध्दतीने NeML पोर्टलवरून PFMS प्रणालीद्वारे अदा करण्यात येतात. तसेच NeML पोर्टलवर शेतकरी नोंदणी करतांना धान खरेदीदार सबएजंट संस्थाकडून शेतक-यांचे बँक खाते क्रमांक, आय.एफ.एस.सी. कोड व इतर योग्य माहिती न घेतल्यामुळे शेतकरी चुकारे अदा करतांना अडचणी निर्माण होत आहे. अशा अडचणीमुळे शेतक-यांना चुकारे अदा करण्यास विलंब होत आहे.

खरेदी केलेल्या धान व भरडधान्याचे काही शेतक-यांचे, खरेदी कालावधीामध्ये तसेच खरेदी नंतर काही बँकेचे आय.एफ.एस.सी. कोड मध्ये बदल झाला असल्याने शेतकरी चुकारे परत येत आहे. तसेच ज्या शेतक-यांचे चुकारे अदा करतांना चुकीचे बँक खाते क्रमांक, चुकीचे आय.एफ.एस.सी. कोड, डुप्लीकेट एन्ट्री, पेमेंट होल्ड रजिस्ट्रेशन न होणे, फ्रिज खाते व संयुक्त खाते तसेच बँकेच्या काही तांत्रिक अडचणीमुळे चुकारे शेतक-यांच्या खात्यात जमा झाले नाही. त्यामुळे 14 मार्च 2024 पासून NeML पोर्टल बँक मॉडिफिकेशन करीता पुढील एक महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे.

तरी मुदतीमध्ये ज्या धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री केली आहे, त्याच केंद्रावर जाऊन शेतक-यांनी बँक मॉडिफिकेशन तात्काळ करून घ्यावे, जेणेकरून शेतकरी चुकारे करणे सोयीचे होईल, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी व्ही. एस. तिवाडे यांनी कळविले आहे.