विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या मागणीला यश, कृषी सेवा परीक्षेतील उमेदवारांना नियुक्ती

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या मागणीला यश, कृषी सेवा परीक्षेतील उमेदवारांना नियुक्ती

मुंबई, दि. 2 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा मधून उमेदवारांची शिफारस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शासनाकडे केली होती. या उमेदवारांना अनेक दिवसांपासून नियुक्ती न दिल्याने ते आझाद मैदानात बेमुदत आंदोलनाला बसले होते. या उमेदवारांना नियुक्तीचे आदेश तात्काळ द्यावेत, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली केली होती. श्री. वडेट्टीवार यांच्या मागणीला यश आले असून निवड झालेल्या उमेदवारांनी श्री. वडेट्टीवार यांचे आभार मानले आहेत.

कृषी सेवा परीक्षेतील शिफारस केलेल्या उमेदवारांच्या नियुक्त्या रखडल्याने या उमेदवारांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले होते. श्री. वडेट्टीवार यांनी केलेल्या मागणीमुळे नियुक्तीसंदर्भात शासन निर्णय निर्गमित झाला आहे. यामुळे उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. नियुक्त्या रखडल्यामुळे अनेक जिल्ह्यात कृषी अधिकारी पदाच्या जागा रिक्त होत्या. यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत होती. शेतकरी संकटात आहे. या परिस्थितीत नियुक्त्या वेळीच करणे अपेक्षित होते, अशी प्रतिक्रिया देत निवड झालेल्या उमेदवारांचे श्री. वडेट्टीवार यांनी अभिनंदन केले आहे.