दूध अनुदान योजनेत सहभागी होण्याचे आवाहन

    दूध अनुदान योजनेत सहभागी होण्याचे आवाहन

    गडचिरोली, दि.30: राज्य शासनाच्या दिनांक 05 जानेवारी 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील सहकारी दूध संघ तसेच खाजगी दूध प्रकल्पांना गाय दूधाचा पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना शासनाकडून प्रतिलिटर रु.5/- अनुदान योजना जाहीर करण्यात आली आहे. सदर योजनेची अंमलबजावणी दि. 11 जानेवारी पासुन करण्यात आली असून सदर योजना दि.10 फेब्रुवारी 2024 पर्यत कार्यरत राहिल. राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पामार्फत संकलित होणाऱ्या गाय दुधाकरीता दूध उत्पादक शेतकरी यांना प्रति लिटर रु.5/- इतके अनुदान देय राहील. तसेच सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पामार्फत दूध उत्पादक शेतकरी यांना 3.5 फॅट/8.5 एसएनएफ या गुणप्रती करीता किमान रु.27/- प्रतिलिटर इतका दर संबधित दूध उत्पादक शेतकऱ्याच्या वैयक्तिक बँक खात्यावर रोख विरहीत पद्धतीने (ऑनलाईन) अदा करणे बंधनकारक राहिल. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने रु.230 कोटी इतक्या निधीची तरतुद केलेली आहे. सदर योजनेच्या अंमलबजावणीकरीता बँकेमार्फत विशेष सॉफ्टवेअर प्रकल्पांना उपलब्ध करुन देण्यात आले असून दूध उत्पादकांनी आपल्या दुभत्या जनावराची माहिती प्रकल्पामार्फत पोर्टलमध्ये भरावयाची आहे. राज्य शासनाच्या अनुदान योजनेमुळे राज्यातील खाजगी व सहकारी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना थेट अनुदानाचा फायदा होत असून सदर योजनेत गडचिरोली जिल्ह्यातील दूध उत्पादकांनी प्रकल्पामार्फत सहभाग नोंदविण्याचे आवाहन शासनामार्फत करण्यात येत आहे. अनुदान योजनेविषयी अधिक माहितीसाठी कृपया संबधित जिल्ह्याचे जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, गडचिरोली, पशुसंवर्धन अधिकारी, गडचिरोली अथवा प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, नागपूर यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा असे जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, गडचिरोली एस.एल. नवले यांनी कळविले आहे.