नागरिकांनी मुद्रांक शुल्क अभय योजनेचा लाभ घ्यावा

नागरिकांनी मुद्रांक शुल्क अभय योजनेचा लाभ घ्यावा

चंद्रपूर, दि. 16: शासनाने मुद्रांक शुल्क व दंड सवलत “अभय योजना -2023” लागू केली आहे. ही योजना 1 डिसेंबर 2023 ते 31 जानेवारी 2024 आणि 1 फेब्रुवारी ते 31 मार्च 2024 या कालावधीत दोन टप्यात लागू केली आहे.

पहील्या टप्प्यात 1 डिसेंबर 2023 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत अर्ज सादर केल्यास रुपये 1 ते 1 लाख इतक्या फरकाच्या रक्कमेसाठी मुद्रांक शुल्क व दंडामध्ये 100 टक्के माफी दिली आहे. तसेच 1 लाखापेक्षा जास्त मुद्रांक शुल्कास 50 टक्के माफ व दंड 100 टक्के माफ केला आहे. त्याचप्रमाणे, रुपये 1 ते 25 लाख इतक्या फरकाच्या रक्कमेसाठी मुद्रांक शुल्क 25 टक्के व दंडाची रक्कम 25 लाखापेक्षा कमी असल्यास 90 टक्के माफी दिली आहे. दंडाची रक्कम 25 लाखापेक्षा जास्त असल्यास केवळ 25 लाख भरणे व त्यापुढील रकमेस सवलत देय आहे. तसेच रुपये 25 कोटीपुढील जास्त असलेल्या मुद्रांक शुल्क फरकाच्या मुद्रांक शुल्कामध्ये 20 टक्के सवलत व दंडामध्ये फक्त रुपये 1 कोटी भरावयाचे आहे. त्यापुढील रकमेसाठी सवलत देय आहे.

 दुसऱ्या टप्प्यात 1 फेब्रुवारी ते 31 मार्च 2024 या कालावधीत अर्ज सादर केल्यास रुपये 1 ते 1 लाख इतक्या फरकाच्या रक्कमेसाठी मुद्रांक शुल्क व दंडामध्ये 80 टक्के माफी दिली आहे. तसेच 1 लाखापेक्षा जास्तचे प्रकरणात मुद्रांक शुल्क 40 टक्के व दंड 70 टक्के माफ केलेला आहे. त्याचप्रमाणे, रुपये 1 ते 25 कोटी इतक्या फरकाच्या रकमेसाठी मुद्रांक शुल्क 20 टक्के सवलत व दंडाची रक्कम 50 लाखापेक्षा कमी असल्यास 80 टक्के माफी आणि जर दंडाची रक्कम 25 लाखापेक्षा जास्त असल्यास केवळ रुपये 50 लाख भरणे व त्यापुढील रकमेस सवलत देय आहे.  तसेच 25 कोटीपेक्षा जास्त असलेल्या मुद्रांक शुल्क फरकाच्या रकमेसाठी मुद्रांक शुल्कामध्ये 10 टक्के सवलत व दंड जास्तीत जास्त 2 कोटी रुपये भरावा लागेल व त्यापुढील रकमेस सवलत देय आहे.

शासनामार्फत सुरु असलेल्या “अभय योजना-2023” अंतर्गत दंड सवलत योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा. कार्यालयामार्फत ज्यांना मुद्रांक शुल्क भरण्याबाबत नोटीस प्राप्त झालेली आहे, त्यांनी योजनेचा लाभ घेण्याकरीता तसेच शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांनी आपला अर्ज सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, नवीन प्रशासकीय इमारत, पहिला मजला, हॉल क्र.4,चंद्रपूर या कार्यालयात किंवा तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात सादर करावा,असे आवाहन चंद्रपूरच्या मुद्रांक जिल्हाधिकारी अंकिता तांदळे यांनी केले आहे.