अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. धर्मरावबाबा आत्राम यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे विषबाधा झालेल्या मुलींची भेट घेतली

अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. धर्मरावबाबा आत्राम यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे विषबाधा झालेल्या मुलींची भेट घेतली         

गडचिरोली, दि.21: सोडे येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनींना अन्नातून विषबाधा : सर्वांच्या तब्येती सामान्य गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील सोडे येथील शासकीय मुलींच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना काल दिनांक २० डिसेबर २०२३ रोजी अन्नातून विषबाधा झाली. प्राप्त माहितीनुसार दुपारच्या जेवनानंतर काही मुलींना दुपारी ३ वाजताच्या सुमारास पोटदुखी, मळमळ, उलटी, डोकेदुखी, भोवळ अशा प्रकारचे त्रास होऊ लागले. थोड्याच वेळात आजारी विद्यार्थिना ग्रामीण रुग्णालय, धानोरा येथे भरती करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच पुन्हा संध्याकाळी आणखी काही विद्यार्थिनीची प्रकृती बिघडली. त्यांनाही संध्याकाळी ग्रामीण रुग्णालय, धानोरा येथे भरती करण्यात आले. यातील ४० विद्यार्थ्यांना पुढील उपचाराकरीता जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे काल रात्रीच पाठविण्यात आले. अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती मिळताच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते व निवासी वैद्यकीय अधिकारी ( बाह्यसंपर्क) डॉ. बागराज धुर्वे यांनी ग्रामीण रुग्णालय, धानोरा येथे जाऊन भरती मुलींची चौकशी व तपासणी केली. आज सकाळपर्यंत एकूण १०९ मुलींना विषबाधा झाल्याने ग्रामीण रुग्णालय, धानोरा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलेले असुन ६९ विद्यार्थ्यांनींवर उपचार सुरु आहेत. सर्व मुली ८ ते १८ वर्षे वयोगटातील असुन आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी दिलेली आहे. जिल्हाधिकारी संजय मिणा व प्रकल्प अधिकारी राहुलकुमार मिणा यांनी जिल्हा रुग्णालयास भेट देऊन भरती ४० मुलींच्या तब्येतीबाबत व्यक्तीश चौकशी केली. सर्व भरती मुलींच्या व सोबतच्या नातेवाईकांच्या आहाराची व संदर्भ सेवेची व्यवस्था करण्यात आलेली असुन आरोग्य यंत्रणा चौकस असल्याचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतिशकुमार सोळंके यांनी सांगितले. अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. धर्मरावबाबा आत्राम यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे विषबाधा झालेल्या मुलींची भेट घेऊन मुलींच्या तब्येतेची विचारपूस केली व आदिवासी विकास विभागातर्फे चौकशी करण्याचे आदेश दिले.