अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी शबरी आदिवासी घरकुल योजना

अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी शबरी आदिवासी घरकुल योजना

Ø संबंधित ग्रामपंचायतीकडे अर्ज सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 02 :  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर अंतर्गत चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, जिवती, कोरपणा, पोंभुर्णा, गोंडपिपरी, मुल, सिंदेवाही व सावली या कार्यक्षेत्राकरीता दि. 2 जुन 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये सन 2023-24 करीता शबरी आदिवासी घरकुल योजनेचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. सदर तालुक्यात आदिवासी असलेल्या व ग्रामीण भागात वास्तव्य करीत असलेल्या अनुसूचित जमातीच्या ज्या कुटुंबाकडे रहावयास स्वतःचे घर नाही तर काहींची घरे कुडामातीची आहेत अशा अनुसूचित जमातीच्या कुटुंबाकरीता शबरी आदिवासी घरकुल योजना राबविण्यात येत आहे.

दि. 26 नोव्हेंबर 2013 व 15 मार्च 2016 च्या शासन निर्णयान्वये, पेसा अधिनियमाशी सुसंगत कार्यवाही करण्याकरीता शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत ग्रामीण भागामध्ये अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांची निवड ग्रामसभेमार्फत करण्याबाबत निर्देश आहेत. त्याअनुषंगाने, या प्रकल्प कार्यालयाच्या क्षेत्रातील कोणतीही ग्रामपंचायत व त्याअंतर्गत कोणतीही गावे शबरी आदिवासी घरकुल योजनेपासून वंचित राहू नये, आदिवासी लोकसंख्येच्या प्रमाणात सर्व ग्रामपंचायतींना शबरी घरकुल योजनेचा लाभ मिळावा, वेळेची व खर्चाची बचत व्हावी तसेच ग्रामस्तरावर ग्रामसभेमार्फत गरजू व पात्र लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त करण्याकरीता ग्रामपंचायतींनी प्राधान्य क्रमानुसार परिपूर्ण कागदपत्रासह लाभार्थ्यांचे अर्ज व यादी ग्रामपंचायतमार्फत संबंधित पंचायत समितीकडे सादर करण्यात यावे. व पंचायत समितींनी कागदपत्रांची पडताळणी करून पात्र व परिपूर्ण कागदपत्रे असलेल्या लाभार्थ्यांची यादी शबरी घरकुल निवड जिल्हास्तरीय समितीच्या मंजुरीसाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांना पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

आवश्यक कागदपत्रे:

अर्जासोबत गाव नमुना-8, घरटॅक्स पावती, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, चालू वर्षाचा रहिवासी दाखला, ग्रामसभेचा ठराव, रेशनकार्ड, आधारकार्ड, स्वमालकीची जागा असणे आवश्यक आहे. संपूर्ण माहिती भरलेला परिपूर्ण पासपोर्टसहित अर्ज, किमान 15 वर्षाचे रहिवासी दाखला, घरकुल मंजुरी पूर्वीचे घराचे फोटो, आदी कागदपत्रे जोडून ग्रामपंचायत कार्यालयास सादर करावयाचे आहे.

तालुका निहाय लक्षांक/उद्दिष्ट :

चंद्रपूर 1539, बल्लारपूर 513, राजुरा 801, कोरपणा 492, गोंडपिपरी 432, पोभुर्णा 420, जिवती 891, सावली 423, मुल 492 व सिंदेवाही 1007 असे एकूण 7010 चे घरकुलाचे उद्दिष्ट संबंधित पंचायत समितींना निश्चित करून देण्यात आले आहे. ग्रामपंचायतनिहाय आदिवासी लोकसंख्येच्या प्रमाणात शबरी आदिवासी घरकुल योजनेचे उद्दिष्ट पंचायत समिती निश्चित करून देणार आहे. त्यानुसार ग्रामपंचायतकडून ग्रामसभेमार्फत पात्र व गरजू लाभार्थ्यांच्या अर्जासह सदर यादी पंचायत समिती कार्यालयाकडे सादर करण्यात येणार आहे. सदरची शिफारस निवड यादी पंचायत समिती कार्यालयाकडून प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर या कार्यालयांना जिल्हास्तरीय निवड समितीच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.

इच्छुक, पात्र व गरजू अनुसूचित जमातीच्या बांधवांनी परिपूर्ण कागदपत्रासह शबरी घरकुल योजने करीता प्रसिद्धीच्या दिनांकापासून 7 दिवसाच्या आत संबंधित ग्रामपंचायतकडे अर्ज सादर करावा, असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी मुरुगानंथम एम, यांनी केले आहे.