शेतकऱ्यांकरिता पी-एम कुसुम सौर कृषीपंप योजनेसाठी अर्ज आमंत्रित

शेतकऱ्यांकरिता पी-एम कुसुम सौर कृषीपंप योजनेसाठी अर्ज आमंत्रित

 

भंडारा, दि. 29 मे, : शेतकऱ्यांच्या कृषीपंप वीज जोडण्यांचे विद्युतीकरण सौर उर्जेव्दारे करण्यासाठी राज्य शासन स्वयंअर्थसहाय्यित व केंद्र शासनाच्या अर्थसहाय्यातून विविध योजना राबवित आहेत. पीएम कुसुम याजनेंतर्गत सौर कृषीपंपासाठी सर्वसाधारण गटासाठी 90 टक्के तर अनुसूचित जाती व जमातीच्या गटासाठी 95 टक्के अनुदान देण्यात येते. जिल्ह्याच्या ग्रामीण लोकसंख्येनुसार व प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर महाऊर्जा मार्फत या योजनेकरिता शेतकऱ्यांचे नवीन अर्ज स्वीकरण्यासाठी दिनांक 17 मे, 2023 पासून ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 

महाऊर्जा मार्फत ऑनलाइन पोर्टल सुरू केल्यानंतर त्यास प्रचंड प्रतिसाद प्राप्त झाला असून एकाच वेळी असंख्य शेतकरी अर्ज करण्याच्या प्रयत्नात असल्याने प्रक्रिया होण्यास विलंब होत आहे. तरी सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता यावा म्हणून पोर्टलचा दररोज आढावा घेऊन जिल्हानिहाय कोटा वाढवून देण्यात येत आहे. तरी शेतकऱ्यांनी कोटा उपलब्ध नसल्यास, वाट पाहून कोटा उपलब्ध झाल्यावर अर्ज करावा. सौर कृषीपंपाच्या मागणीसाठी नवीन अर्ज करण्याकरीता https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/kusum-yojana-component-B या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

अनुदानावर आधारित या योजनेसाठी अनुसूचित जातीकरीता 3 एचपी पंपासाठी 9 हजार 690, 5 एचपी पंपसाठी 13 हजार 488 तर 7.5 एचपी पंपासाठी 18 हजार 720, अनुसूचित जमातीकरीता 3 एचपी पंपासाठी 9 हजार 690, 5 एचपी पंपसाठी 13 हजार 488 तर 7.5 एचपी पंपासाठी 18 हजार 720 तर खुल्या प्रवर्गातील जातीकरीता 3 एचपी पंपासाठी 19 हजार 380, 5 एचपी पंपसाठी 26 हजार 975 तर 7.5 एचपी पंपासाठी 37 हजार 440 रुपये शेतकरी लाभार्थ्यांना भरावयाचा आहे.