शेतकऱ्यांनी तेलबिया पिकाची लागवड करण्याचे कृषी विभागाचे आवाहन
चंद्रपूर, दि. 03 : भारतामध्ये तेलबियांची विविधता अधिक असून जागतिक पातळीचा विचार करता लागवडही 14-15 टक्के इतकी आहे. मात्र, खाद्य तेल उत्पादनात केवळ 6-7 टक्के इतकाच वाटा आहे. पर्यायाने दरवर्षी खाद्यतेल आयातीचे प्रमाण वाढत असून, त्याचा ताण अर्थव्यवस्थेवर येत आहे. तेलबिया जसे सोयाबीन, करडई, जवस, मोहरी या अपारंपारीक पिकाच्या क्षेत्रात वाढ केल्याने जी 70 हजार ते 1 लाख कोटी रूपयाच्या तेलाची बाहेर देशातुन आयात करावी लागते, त्याचप्रमाणे आयात कमी होवून तेलावरील बाहेरील देशावरचे अवलंबत्व कमी होईल. तसेच रब्बी हंगामाचे क्षेत्र सुध्दा वाढेल. अशावेळी करडईसारखे कोरडवाहू पीक महत्त्वाचे ठरू शकते. भारतात खाद्यतेलाची मागणी व पुरवठा यामध्ये मोठी तफावत आहे. सुमारे 60 टक्के तेल आयात करावे लागते.
तेलबिया उत्पादनांपैकी 85 टक्के वाटा भुईमूग, सोयाबीन आणि मोहरी यांचा एकत्रितपणे आहे. कोरडवाहू क्षेत्रातही चांगल्या प्रकारे उत्पादन देणाऱ्या करडईसारख्या पिकाला प्राधान्य दिले पाहिजे. यामुळे कोरडवाहू क्षेत्रातही तेलबियांचे उत्पादन शक्य होईल. त्यातून खाद्य तेलाबाबतची स्वयंपूर्णता गाठणे शक्य होईल.
त्यामुळे शेतकऱ्यांपी जास्तीत जास्त प्रमाणात खादयतेलाची लागवड करावी व रब्बी क्षेत्रात वाढ करावी. असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.









