मानवी तस्करी रोखण्यासाठी आंतरराज्यीय वाहतुकीवर नजर ठेवा- महीला आयोगाचे निर्देश

मानवी तस्करी रोखण्यासाठी आंतरराज्यीय वाहतुकीवर नजर ठेवा- महीला आयोगाचे निर्देश

· बालविवाह प्रतिबंधासाठी कडक कारवाई करा

 

भंडारा, : महिलांवरील अत्याचार दूर करणे आणि बालके व महिलांच्या तस्करीला आळा घालणे ही राज्यशासनाची प्राथमिकता आहे. मानवी तस्करीमध्ये स्त्रिया व बालके यांची संख्या लक्षणीय आहे. हे रोखण्यासाठी भंडारा जिल्हयातील सीमालगतच्या आंतरराज्यीय वाहतुकीवर बारकाइने लक्ष ठेवण्याचे निर्देश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आज पोलीस विभागाला दिले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आज महीला व बालविकास विभाग,वात्सल्य योजनेचा तसेच महिलाविषयक योजनांचा विस्तृत आढावा घेतला.

 

यावेळी राज्य महिला आयोगाच्या सदस्य आभा पांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी,पोलीस अधिक्षक लोहित मतानी, महिला व बालविकास विभागाच्या उपायुक्त अपर्णा कोल्हे ,जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तुषार पौनीकर,आदी मंचावर उपस्थित होते.

 

बॅक ऑफ इंडीयातर्फे आरसेटीमार्फत महीलांना विविध प्रशिक्षणाव्दारे आर्थिक निर्भर करण्याचा प्रयोग हा प्रशंसनीय असून राज्यस्तरावर हा उपक्रम राबविण्याबाबत आयोग शासनाला सूचना करेल असे त्यांनी सांगितले. 2021 च्या सर्वेक्षणात दक्षिण आशियामध्ये दीड लाख मानवी तस्करीची प्रकरणे पुढे आली. यामध्ये बांग्लादेश, नेपाळ,भुटान यांच्यापाठोपाठ भारताचाही क्रमांक लागतो. भारतात मानवी तस्करीच्या प्रकरणात महाराष्ट्राचा चौथा क्रमांक लागतो. ही गंभीर बाब असून महिला आयोग, पोलीस प्रशासन ,विविध सामाजिक संस्था यांच्यासोबतच समाजाच्या विविध घटकांनीही एकत्ररित्या कार्य करण्याची गरज असल्याचे श्रीमती चाकणकर यांनी सांगितले.

 

यावेळी महिला व बालकांसाठीच्या पोलीस विभाग,महीला व बालकल्याण,तसेच आरोग्य विभाग, परिवहन महामंडळ आणि जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा विस्तृत आढावा त्यांनी घेतला. माता –भगीनींसाठी कार्य करतांना अधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेने काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

महीलांना समाजात सुरक्षित वातावरण मिळाले पाहीजे यासाठी मानसिकता बदलणे गरजेचे असल्याचे श्रीमती चाकणकर यांनी सांगितले.येणाऱ्या जून महीन्यात पुन्हा राज्य् महीला आयोग भंडारा जिल्हयातील कामाचा आढावा घेईल असे ही त्यांनी बैठकीत सांगितले. विस्तृत आढाव्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.