शिर्डी येथील महाएक्स्पो राज्यस्तरीय पशुपशी प्रदर्शनीत चंद्रपूर जिल्ह्यातील कठाणी गाय ठरली प्रथम विजेती

शिर्डी येथील महाएक्स्पो राज्यस्तरीय पशुपशी प्रदर्शनीत

चंद्रपूर जिल्ह्यातील कठाणी गाय ठरली प्रथम विजेती

 

चंद्रपूर, दि. 28 : महाएक्स्पो राज्यस्तरीय पशुपशी प्रदर्शनी शिर्डी येथे 24 ते 26 मार्च कालावधीत घेण्यात आली. राज्यस्तरीय प्रदर्शनात 12 राज्यातून 250 प्रजातींच्या जातीवंत गाय, म्हैस, घोडे, शेळी, मेंढी, कुक्कुट, श्वान, मांजर, बदके, तितर यासह 823 पशुंचा सहभाग होता. यात चंद्रपूर जिल्ह्यातील कठाणी गाय ही प्रथम क्रमांकाची विजेती ठरली.

 

या राज्यस्तरीय प्रदर्शनीचे उद्घाटन महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. अध्यक्षस्थानी कृषिमंत्री अब्दुल सत्तार होते. तसेच राज्यस्तरीय प्रदर्शनीच्या समारोपीय कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पशुपशी प्रदर्शनीत आलेल्या शेतकरी / पशुपालकांना शुभेच्छा दिल्या. तसेच शेतकरी हा शासनाचा केंद्रबिंदु असून शेतकरी व इतर घटकांसाठी राज्याचा पंचामृत अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे, असे सांगितले.

 

या प्रदर्शनात सहभागी असलेल्या प्रजाती पशुचे स्पर्धात्मक व गुणात्मक परीक्षण करून प्रत्येक प्रजातीतून प्रथम तीन क्रमांकाच्या पशुमालकांना तसेच जिल्ह्यतील वरोरा तालुक्यातील शुभम शंकर ढफ यांच्या कठाणी गायीला प्रमुख अतिथीच्या हस्ते शिल्ड / ट्रॉफी, प्रमाणपत्र, रक्कम देऊन गौरविण्यात आले. या प्रदर्शनीमधील विविध स्टाल, मंडपमधील पशुला प्रमुख अतिथी, राज्याचे प्रधान सचिव जे.पी.गुप्ता, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांनी भेट देऊन माहिती जाणुन घेतली.

 

तसेच राज्यस्तरीय प्रदर्शनीमध्ये चंद्रपूरचे जिल्ह्यधिकारी विनय गौडा, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, यांच्या मार्गदर्शनात जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मंगेश काळे व डॉ. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी उमेश हिरूडकर यांच्या नेतृत्वात पशुविकास अधिकारी डॉ. विकास ताजणे, सहा.पशुधन विकास अधिकारी डॉ बंडू आकनुरवार, डॉ राहुल घिवे, डॉ हेमंत घुई, पशुधन पर्यवेक्षक डॉ. सुनिल आलाम, डॉ दत्ता नन्नावरे, डॉ जंयत खानेकर आदी सहभागी झाले होते.