शेळीपालनासाठी मनरेगातुन उभारले शेड बासोराचे दसाराम टीकाराम कांबळे यांची यशोगाथा

शेळीपालनासाठी मनरेगातुन उभारले शेड

बासोराचे दसाराम टीकाराम कांबळे यांची यशोगाथा

 

भंडारा दि. 9 :भंडारा तालुक्यातील बासोरा गावाचे दसाराम कांबळे एक अल्पभुधारक शेतकरी. फक्त एक एकर शेतजमीन आणि परिवारात पाच माणसं. त्यातही एक मुलगा दिव्यांग. अशा परिस्थितीत कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्यांचे उत्पन्न पुरत नव्हते.आर्थिक टंचाईशी झगडत आसपासच्या गावांमध्ये शेतमजूरी करून दसाराम आपल्या कुटुंबाचे पोट भरत होते.

 

दसाराम कांबळेकडे 1 एकर शेती होती. पण कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्याचे उत्पन्न पुरत नव्हते.आसपासच्या गावांमध्ये शेतमजुरी करून श्री. कांबळे आपल्या कुटुंबाचे पोट भरत होते. त्यांना तीन अपत्य , त्यातील एक मुलगा दिव्यांग असल्याने त्याच्या भविष्याची काळजी आई बाप म्हणून त्या दोघांना होती.

 

2013-14 मध्ये पहिल्यांदा त्यांच्या पत्नीने बचत गटातून 10 हजार रुपये कर्ज घेऊन 3 शेळ्या विकत घेतल्या. वर्षभरातच त्याच्या 10 शेळ्या झाल्या. शेळ्या घेतल्यापासून ते या शेळ्या घराबाहेरच बांधत होते. थंडी, ऊन व वाऱ्याने त्यांना आजार व्हायचे. त्यांच्या शेळीपालनाच्या उद्योगाची धडपड पाहून रोजगार सेवकाने त्यांना मनरेगामधून शेळी शेड मिळण्यासाठी अर्ज करण्याची माहिती दिली.

 

त्यांना मनरेगाची काहीच माहिती नव्हती त्यामुळे रोजगार सेवकाने मार्गदर्शन केल्याप्रमाणे आधी ग्रामपंचायतीत शेळी शेड मिळण्याकरीता नाव नोंदवलं.नंतर पुढे आराखडा मंजूर झाल्यानंतर आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची जमवाजमव केली. यात ग्रामरोजगार सेवक, सरपंच, पंचायत समितीतील अधिकारी यांची फार मदत त्यांना मिळाली.

 

2015 च्या मार्चमध्ये त्यांना ही योजना मंजूर झाली आणि डिसेंबरपर्यंत त्यांच्या घराजवळ 6 X 3 मी. चे शेळी शेड उभे राहिले. उघड्यावर शेळ्या पाळताना त्यांना फार त्रास व्हायचा. शेड उभारल्यामुळे ऊन, पाऊस, वारा यांच्यापासून संरक्षण झाल्याने शेळ्यांचं आरोग्य चांगलं राहायला मदत झाली. उघड्यावर लेंडी खतही तयार व्हायचे नाही शेडमुळे त्यांना लेंडीखत भरपूर प्रमाणात मिळायला सुरूवात झाली. तेव्हापासून शेळ्यांच्या आणि लेंडीखताच्या विक्रीतून त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारत गेली.

 

त्यांचा मुलगा अस्थिव्यंग असल्यामुळे इतर मुलांसारखं शिक्षण आणि नोकरी करू शकत नाही पण शेळी पालनात तो मनापासून रमला आहे. शेळ्यांच्या देखभालीत तो त्यांना मदत करतो. शेड उभारल्यामुळे ते शेळ्यांच्या संख्येत वाढ करत गेले. 2015 पासून सुरू केलेल्या या व्यवसायाने त्यांना आर्थिक चणचणीतून बाहेर काढले. त्यांनी त्यांच्या मुलांचे शिक्षण, लग्न केली आणि एक पक्क घर बांधले.

 

त्यांच्या व्यवसायाने जोर पकडला पण शेळ्यांची संख्या वाढल्याने त्यांना ते शेड अपूरे पडायला लागले. मग त्यांनी तात्पुरत काही शेळ्यांना पूर्वीप्रमाणेच घराबाहेर उघड्यावर बांधत होते. मात्र अचानक आलेल्या साथीच्या रोगाने त्यातला 45 शेळ्या मरण पावल्या. त्यांच नुकसान झालं पण त्यांनी निराश न होता एक महत्त्वाचा निर्णय घेतला.

 

ज्या शेळीव्यवसायाने त्यांना भरारी दिली त्या शेळ्यांना असं उघड्यावर न बांधता त्यांच्यासाठी मोठ्या आकाराचं शेड त्यांनी शेतात बांधण्याचे ठरवले. शेळीव्यवसायातून मिळालेल्या फायद्यातून साठवलेली रक्कम सुमारे 2 लाख त्यांच्या जवळ होती आणि विजया बॅंक, भंडारा येथून 2 लाखांचे कर्ज त्यांनी घेतले. एकूण जमलेल्या 4 लाख रकमेचा वापर करून त्यांनी शेतात 24X9 मी. चे शेड उभारले. 2020-21 पासून ते या शेडमध्ये शेळीपालन आणि कुक्कुटपालन करत आहे. सुरूवातीला 2015 मध्ये शेळीपालनासाठी मनरेगामधून शेडस्वरुपात पाठींबा मिळाला नसता तर कदाचित हा व्यवसाय वाढवण्याचा त्यांनी विचार ही केला नसता. मनरेगा योजनेतुन आर्थिक स्थैर्याकडे नेणारा शेळीपालन व त्यासाठी लागणारे शेडनेटमुळे आलेली सुरक्षीतता ही शासकीय योजना व योग्य लाभार्थी यांची सांगड घालणारी यशकथा आहे.

शैलजा वाघ दांदळे,

जिल्हा माहिती अधिकारी,भंडारा