जन्माला आलेल्या पाल्यांचे आधारकार्ड नोंदणी करून घ्यावे – जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर / दहा वर्षापूर्वी काढलेले आधारकार्ड अपडेट करावे

जन्माला आलेल्या पाल्यांचे आधारकार्ड नोंदणी करून घ्यावे – जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

 दहा वर्षापूर्वी काढलेले आधारकार्ड अपडेट करावे

भंडारा,दि. 12 : केंद्र शासनाच्या वतीने देशभर नागरिकांच्या आधारकार्ड नोंदणीची मोहिम मोठया प्रमाणावर राबविण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये बहुतांश नागरिकांचे आधारकार्ड काढण्यात आले आहे. जन्माला आलेल्या पाल्यांचे त्यांच्या पालकांनी आधार कार्ड नोंदणी करून घ्यावी. त्यामुळे पाल्यांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेण्यामध्ये याचा फायदा होईल. दहा वर्षापूर्वी काढलेले आधारकार्ड अपडेट करणे आवश्यक असून जिल्ह्यातील ज्या नागरिकांना आधार नोंदणी करुन दहा वर्ष कालावधी पूर्ण झाला आहे, त्यांनी आपले आधारकार्ड अपडेट करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.

सदर बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजीत करण्यात आली असून बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटिल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. डी.के.सोयाम, जिल्हा आरोग्य अधिकारी मिलींद सोमकुवर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन पानझाडे, पोलीस उपअधीक्षक (गृह) विजय डोळस, शिक्षणाधिकारी माध्यमीक संजय डोर्लीकर यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

पुढे ते म्हणाले, आधारकार्ड काढल्यानंतर कालांतराने अनेक बदल होत असतात. जसे पत्ता, नावातील चुका, मोबाईल क्रमांक यासह अनेकदा एकापेक्षा अधिक आधार कार्ड नोंदणी झाले असल्याचीही शक्यता असते. आधारकार्डला संबंधितांची माहिती नोंद असल्याने यासर्व नोंदीचे अद्यावतीकरण होणे आवश्यक असते. त्यासाठी दहा वर्षांनी आधार ईकेवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे ज्या नागरिकांना आधारकार्ड काढून दहा वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला आहे. त्यांनी आपल्या नजीकच्या आधार केंद्रावर जाऊन केवायसी करुन घेणे आवश्यक आहे.

यासाठी शासनाने 50 रुपये इतके शुल्क निर्धारित केले आहे. ज्या नागरिकांनी आपल्या पाल्यांचे अद्यापही आधारकार्ड काढलेले नाही त्यांनी आधारकार्डसाठी ऑनलाईन नोंदणी करावी व ज्यांचा आधारकार्ड काढून दहा वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला आहे. त्यांनी आपले आधारकार्ड अपडेट करुन घ्यावे.