मत्स्यव्यवसाय विभाग व आत्मा विभाग यांच्या संकल्पनेतून मत्स्यजिऱ्यापासून बोटुकली उत्पादन घेण्यासाठी शेत तलाव धारक शेतकऱ्यांकरिता प्रत्यक्षिक कार्यक्रम संपन्न

मत्स्यव्यवसाय विभाग व आत्मा विभाग यांच्या संकल्पनेतून मत्स्यजिऱ्यापासून बोटुकली उत्पादन घेण्यासाठी शेत तलाव धारक शेतकऱ्यांकरिता प्रत्यक्षिक कार्यक्रम संपन्न

गडचिरोली, दि.11: जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलसाठा उपलब्ध आहे. जलाशय, तलाव, बोड्या, शेततलाव या मध्ये पारंपरिक पद्धतीने मत्स्यव्यवसाय केले जाते. मत्स्यव्यवसायला फायदेशीर करण्यासाठी चांगल्या प्रतीचे मत्स्यबोटूकली संचयन करणे आवश्यक असते. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दर्जेदार मत्स्यबोटुकली ची गरज भासते. गरज लक्षात घेता याकडे व्यवसायिक संधी म्हणून शेतकऱ्यांनी बघितल्यास शेत तलाव व बोड्याचा वापर मत्स्यबीज संगोपणासाठी करता येऊ शकतो. व यामधून 3-4 महिन्याच्या मान्सून कालावधीत चांगला नफा शेतकरी घेऊ शकतात. या संकल्पनेतून सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय गडचिरोली यांनी प्रकल्प संचालक आत्मा यांच्या सौजन्याने शेततलाव धारक शेतकऱ्यांना मत्स्यबीज संगोपन व विक्री व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन भारतीय प्रमुख कार्प मत्स्यजिरे व मत्स्यखाद्य वितरण केले.

सदर प्रायोगिक कार्यक्रम वडसा, कुरखेडा, अरमोरी, गडचिरोली व धानोरा या तालुक्यात राबविण्यात आले. प्रकल्प संचालक आत्मा डॉ.संदीप कराळे यांनी शेततलावत मत्स्य बीज संवर्धन हा अभिनव उपक्रम शेतकऱ्यांची आर्थिक आवक वाढविणारा आहे असे मत व्यक्त केले. सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय शुभम कोमरेवार यांनी या संकल्पनेतून शेताकऱ्यांनी मत्स्यबीज संगोपन केल्यास जिल्हा मत्स्यबीज उत्पादनात आत्मनिर्भर होऊ शकतो व या द्वारे उच्च दर्जाचे बीज उपलब्ध झाल्यास जिल्ह्यातील मत्स्य उत्पादन वाढू शकते असा आशावाद व्यक्त केला.

मत्स्यव्यवसाय विभागचे चमूसह संबंधित तालुक्यातील कृषी अधिकारी व कृषी तंत्र व्यवस्थापक यांच्या सहकार्याने सदर कार्यक्रम राबविणे शक्य झाल्याचे शुभम कोमरेवार यांनी सांगितले.