महिला बचतगटांची भरारीच महिला सक्षमीकरणाचे उत्तम माध्यम  – न्या. अंजू शेंडे Ø सोनचीरैया आधार शहर उपजीविका केंद्रातर्फे वस्तूविक्री प्रदर्शनाचे उद्घाटन

महिला बचतगटांची भरारीच महिला सक्षमीकरणाचे उत्तम माध्यम  – न्या. अंजू शेंडे

Ø सोनचीरैया आधार शहर उपजीविका केंद्रातर्फे वस्तूविक्री प्रदर्शनाचे उद्घाटन

भंडारा, दि. 29 : दिवाळीचा सण तोंडावर आला असून खरेदीची लगबग सुरू आहे. मात्र आजच्या धावपळीच्या युगात सर्व वस्तू घरी बनविणे शक्य होत नाही. अशावेळी रेडिमेड पदार्थांच्या दुकानांकडे नागरीक वळतात. याच संकल्पनेतून भंडारा शहरात महिला बचत गटांनी विविध वस्तु निर्मिती केली असून प्रदर्शनातून माफक दराने विक्रीसाठी आता पुढाकार घेतला आहे. ग्राहकांपर्यत पोहचण्यासाठी व महिला बचत गटांना रोजगार मिळवून देण्यासाठी आधार शहर उपजीविका केंद्रातर्फे महिला बचत गटांना एकत्रित जोडण्याचे काम शहरस्तरीय संघाने केले आहे. या संधीचा फायदा उठवण्यासाठी बचत गटही पुढे येत आहेत. निश्चितच यातून महिलांना रोजगारही मिळत असल्याने महिला बचत गटांची भरारीच महिला सक्षमीकरणाचे उत्तम माध्यम असल्याचे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा अंजू शेंडे यांनी केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत भंडारा नगर परिषद अंतर्गत सोनचीरैया आधार शहर उपजीविका केंद्राच्या वतीने ग्राहकांना दर्जेदार वस्तू देण्यासाठी महिला बचत गट निर्मीत वस्तू प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी त्या बोलत होत्या.
            सदर प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. एस. खुणे, कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश अनिता शर्मा, भंडारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी विनोद जाधव, व्यवस्थापक प्रवीण पडोळे, दिवाणी न्यायाधीश एम. ए. कोठारी, मुख्य न्यायदंडाधिकारी पी. एच. कर्वे, कामगार न्यायालयाच्या न्यायाधीश आर. एस. भोसले, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एस. पी. भोसले, जलदगती न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश पी. पी. देशमुख, सह दिवाणी न्यायाधीश आर. पी. थोरे, सह दिवाणी न्यायाधीश पी. ए. पटेल, चेतना नेवारे, एम.जी. हिंगणघाटे, एस. आर. जैन आदी उपस्थित होते.
प्रकल्प व्यवस्थापक प्रविण पडोळे यांनी प्रास्ताविकातून भंडारा शहरात 705 महिला बचत गटांतून 8 हजार 242 महिलांना जोडण्याचे काम शहर स्तर संघ, वस्तीस्तर संघाच्या माध्यमातून झाले आहे, असे सांगितले. महिला बचत गटाने उत्पादीत केलेल्या सिरॅमीक मूर्ती, शोभेच्या वस्तू, मास्क, पेपर डॉल, मेणबत्ती, इमिटेशन ज्वेलरी, लाख बँगल्स व लाख चे सुशोभित वस्तु,मसाल्याचे पदार्थ,गृह उद्योग मसाला,तिखट, हळद, गूळ, पापड, लोणचं, कुरुडी, चकली, अनारसे, बेसन लाडू, मुरमुरा, कासे पितळ भांडे, पणत्या, सुशोभित दिवे, तोरण फुलवात, मातीची सुशोभित वस्तू, भांडी अत्यंत दर्जेदार आहे. ॲमेझॉन, फ्लिपकार्डशी करार केलेला असून विक्रीकरिता उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
 मुख्याधिकारी विनोद जाधव म्हणाले, दोन वर्षांपूर्वी महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नगर परिषदेतर्फे पाणी कर वाटपाची बिले देऊन त्यांचे उत्पन्न वाढीसाठी पुढाकार घेण्यात आला. यासोबतच महिला बचत गटांच्या व वैयक्तिक लाभार्थींच्या उत्पादीत वस्तूंच्या विक्रीकरिता जिल्हा स्तरावर विक्री सेंटर सुरू केले आहे. त्यामुळे व्यावसायिक महिलांना विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असेही ते म्हणाले.
  कार्यक्रमाचे संचालन प्रकल्प व्यवस्थापक प्रविण पडोळे यांनी केले तर आभार समिता भंडारी यांनी मानले. यावेळी शहर स्तरीयसंघाच्या अध्यक्षा समिता भंडारी, सचिव कुंदा बोरकर, कोषाध्यक्ष भावना शेंडे, सदस्य नंदा कावळे, रंजना साखरकर, व्यवस्थापक गुलशन ठवकर, लीना ब्राम्हणकर, संगिता बांते यांच्यासह आधार शहर उपजीविका केंद्राचे सर्व कर्मचारी महिला बचत गटातील महिला उपस्थित होत्या.
भंडारा शहरात 1 नोव्हेंबर पर्यंत राहणार प्रदर्शन
         भंडारा शहरातील सोनचीरैया आधार शहर उपजीविका केंद्राच्या वतीने आयोजित दीपावली निमित्त महिला बचत गट उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री सात  नोव्हेंबर पर्यंत उपलब्ध राहणार आहे. यामध्ये ग्राहकांना कमीत कमी किमतीमध्ये विविध प्रकारच्या सिरामिक मूर्ती, खाद्य कापडी, कागदी फुले, कापडी बॅग,मातीची पितळेची, भांडी विविध प्रकारचे मसाले, लोणचं, शेवई, कुरडई, गूळ, हळद, धनिया पावडर,मास्क, पेपर डॉल, यासोबतच दिवाळीचे फळार, खाद्य पदार्थ व इतर घरगुती घरपोच सुविधा मिळणार आहेत. या सर्व सुविधा व प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान कक्षाचे प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण पडोळे यांनी केले आहे.