‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत शनिवारी पॅन इंडिया महाशिबिराचे आयोजन

‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत शनिवारी पॅन इंडिया महाशिबिराचे आयोजन

भंडारा,दि.21:- विधी सेवा प्राधिकरण व सर्व शासकीय कार्यालयातर्फे 2 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर 2021 पर्यंत ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचे संयुक्त विद्यमाने जे.एम.पटेल महाविद्यालय, भंडारा येथे 23 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 10.30 वाजता पॅन इंडिया महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांचेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती पुस्तिका तसेच महात्मा ज्योतिबा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, वसंतराव नाईक विजाभज विकास महामंडळ, ईतर मागासवर्ग विकास महामंडळ, अपंग कल्याण विकास महामंडळ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांचेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती या महाशिबिरात स्टॉलवर देण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी महाशिबिरात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती घ्यावी, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त डॉ. मंगेश वानखडे यांनी केले आहे.
पॅन इंडीया महाशिबिरात सिकलसेल तपासणी कॅम्प: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व शासकीय कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने 23 ऑक्टोबर 2021 रोजी जे.एम.पटेल महाविद्यालय येथे आयोजित केलेल्या पॅन इंडीया महाशिबिरात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत सिकलसेल तपासणी कॅम्पचे आयोजन करण्यात येत आहे. गरजू व्यक्तींनी सदर तपासणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कळविले आहे.
राज्य परिवहन महामंडळातर्फे विविध योजनांची माहिती: सदर शिबिरामध्ये रा.प. महामंडळ तर्फे महामंडळाच्या विविध सवलतीच्या योजना, आवडेल तेथे प्रवास, विद्यार्थी पासेस, शासनाकडून पुरस्कार प्राप्त नागरिकांसाठी मोफत प्रवास पास आदी योजना तसेच नव्याने सुरू केलेले मालवाहतूक यासंबंधीची जनजागृती करण्यात येणार असून काही लाभार्थ्यांना स्मार्ट कार्डचे वितरण सुध्दा करण्यात येणार आहे.