पीएम श्री सावित्रीबाई फुले विद्यालयाचे तालुकास्तरीय स्पर्धेत सुयश
भूमिका अभिनय व लोकनृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक
चंद्रपूर, 24 सप्टेंबर – चंद्रपूर मनपा पीएम श्री सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय भूमिका अभिनय व लोकनृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे विद्यालयाच्या पथकाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यापूर्वीही तालुकास्तरीय निबंध व चित्रकला स्पर्धेत मनपा शाळांच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावून यश संपादन केले आहे. या सर्व यशामुळे चंद्रपूर मनपा शाळा शिक्षण क्षेत्रात स्पर्धात्मक तसेच सृजनशील वातावरण निर्माण करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेली ही यशस्वी कामगिरी मनपा शाळांसाठी अभिमानाची बाब ठरली असून या यशामुळे जिल्हास्तरावर विद्यालयाकडून अजून भव्य कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशामुळे विद्यालयात आनंदाचे वातावरण असून प्रभारी आयुक्त विद्या गायकवाड, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले, उपायुक्त संदीप चिद्रवार, शाळेचे मुख्याध्यापक मोहारे, तसेच शिक्षक, पालक आणि शाळा व्यवस्थापनाकडून विद्यार्थ्यांच्या कष्टाचे व प्रतिभेचे कौतुक करण्यात आले. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
मनपा शाळांतील विद्यार्थी विविध क्षेत्रात आपली प्रतिभा सिद्ध करत आहेत. अशा प्रकारच्या स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता, आत्मविश्वास व स्पर्धात्मक वृत्ती वाढविण्यास उपयुक्त ठरत आहेत. याशिवाय अशा यशामुळे इतर विद्यार्थ्यांमध्येही प्रेरणा व उत्साह निर्माण होत असून मनपा प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना पुढील स्तरावरील स्पर्धेसाठी आवश्यक सर्वतोपरी सहाय्य दिले जाणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
या स्पर्धेत परीक्षक म्हणून विलास खडसे, विजय वानपत्तीवार व कु. रागीट यांनी काम पाहिले व विद्यार्थ्यांच्या प्रस्तुतीचे कौतुक केले.