आता वीज बिल भरा अन् अतिरिक्त उत्पन्न मिळवा; बेरोजगार, व्यावसायिक आणि बचत गटांसाठी सुवर्णसंधी

आता वीज बिल भरा अन् अतिरिक्त उत्पन्न मिळवा;

बेरोजगार, व्यावसायिक आणि बचत गटांसाठी सुवर्णसंधी

नागपूर, दि. 14 जुलै 2025: वीज बिल भरणा अधिक सुलभ करण्यासोबतच आता अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याचीही संधी महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. महावितरणने स्वतःचे अत्याधुनिक पेमेंट वॉलेट ‘महापॉवरपे’ सुरू केले असून, यामुळे वीज ग्राहकांना बिल भरणे अधिक सोपे झाले आहे, तर 18 वर्षांवरील कोणताही व्यक्ती या वॉलेटचा वापर करून प्रति बिल पावतीमागे 5 रुपये कमिशन मिळवू शकतो. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ही एक उत्तम संधी असून, बेरोजगार तरुण, छोटे व्यावसायिक आणि बचत गटही या योजनेचा लाभ घेऊन आत्मनिर्भर होऊ शकतात.

असे व्हा महावितरणचे ‘वॉलेटधारक’ आणि मिळवा उत्पन्न: महावितरणचे वॉलेटधारक होण्यासाठी काही सोप्या अटी आहेत. 18 वर्षांवरील कोणतीही व्यक्ती आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करू शकते. यात आधार कार्ड, पॅन कार्ड, गुमास्ता प्रमाणपत्र (व्यावसायिकांसाठी), पत्त्याचा पुरावा, पासपोर्ट फोटो, रद्द केलेला धनादेश, वीजेचे बिल आणि भाडेकरूंसाठी भाडे करारनामा यांसारख्या प्रतींसह महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात अर्ज करणे आवश्यक आहे.

ऑनलाइन नोंदणीचीही सोय: तुम्ही www.mahadiscom.in या महावितरणच्या संकेतस्थळाला भेट देऊन आवश्यक कागदपत्रे अपलोड करून ऑनलाइन नोंदणी करू शकता. याशिवाय, महावितरणचे महा पॉवर पे ॲप गुगल प्ले स्टोअरमधून डाउनलोड करू शकतात. यासाठी ॲपवर नोंदणिसाठी मदत देखील उपलब्ध आहे. ॲपमध्ये नोंदणी करून तुमचा मोबाईल नंबर आणि इतर आवश्यक माहिती भरा. अर्जदारांच्या अर्जाची आणि जागेची पडताळणी संबंधित उपविभागीय कार्यालयाकडून विनाशुल्क केली जाते. ही माहिती मुंबई कार्यालयाला पाठवल्यानंतर अर्जांना मंजुरी मिळते. एकदा ऑनलाइन नोंदणी झाल्यावर तुम्ही तब्बल 99 ठिकाणी लॉग-इन करून वीज देयके स्वीकारू शकता. किंवा वॉलेटमधील शिल्लक रकमेतून तुम्ही तुमचे वीजबिल भरू शकता.

वॉलेट रिचार्ज आणि कार्यप्रणाली: महावितरणच्या मुख्य कार्यालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला किमान 5 हजार रुपयांचे वॉलेट रिचार्ज करावे लागते. त्यानंतर एक हजार रुपयांच्या पटीत तुम्ही रिचार्ज करू शकता. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि ऑनलाइन बँकिंगद्वारे वॉलेट रिचार्ज करण्याची सोय उपलब्ध आहे.

वॉलेटधारक महावितरणच्या ॲपमध्ये नोंदणी करून ग्राहकांकडून वीज बिल स्वीकारू शकतात. बिल भरणा झाल्यानंतर संबंधित ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईलवर तात्काळ एसएमएस मिळाल्याने ग्राहकांचे जागेवरच समाधान होते. एकाच वॉलेटचा बॅलेन्स वापरून विविध लॉग-इनद्वारे वेगवेगळ्या व्यक्तींकडून वीज बिल भरून घेण्याची सोयही या वॉलेटमध्ये देण्यात आली आहे.

महावितरण वॉलेटचे फायदे: ग्राहक त्यांच्या मोबाईल किंवा इतर उपकरणांच्या मदतीने कधीही आणि कुठेही वीजबिल भरू शकतात. छोटे व्यावसायिक, जसे की किराणा दुकानदार, मेडिकल स्टोअर्स, किंवा वीज बिल स्वीकारणारी एजन्सीज, वॉलेट वापरून वीजबिल भरून कमिशन मिळवू शकतात. ऍपमध्ये वीजबिल भरणा आणि इतर व्यवहारांची माहिती उपलब्ध असल्याने, वापरकर्त्यांना व्यवहारांमध्ये पारदर्शकता मिळते. ग्राहक ऍपमध्ये वीजबिल पाहू शकतात, तक्रारी नोंदवू शकतात आणि भरलेल्या बिलांचा इतिहास तपासू शकतात.

कोणासाठी आहे ही संधी: ही योजना कोणत्याही सज्ञान व्यक्तीसाठी, दुकानदारांसाठी, छोट्या-मोठ्या व्यावसायिकांसाठी, बचत गटांसाठी, तसेच वीज मीटर रिडींग आणि बिलवाटप एजन्सीसाठी एक उत्तम संधी आहे. प्रत्येक बिलामागे 5 रुपये कमिशन त्याच दिवशी तुमच्या वॉलेटमध्ये जमा केले जाईल. यामुळे तुमच्या नियमित उत्पन्नात भर पडणार आहे.

महावितरणचे ‘महापॉवर्पे’ हे पेमेंट वॉलेट हे केवळ बिल भरणा सुविधा नसून, ते एक अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याचे प्रभावी माध्यम बनले आहे. या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन स्वतःला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे आवाहन मुख्य अभियंता दिलीप दोदके यांनी केले आहे.