प्रधानमंत्री धरती आबा जनभागीदारी अभियानाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम
Ø पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत 5 जुलै रोजी प्रियदर्शिनी सभागृह येथे आयोजन
चंद्रपूर, दि. 3 : आदिवासी भागांमध्ये सेवा आणि पायाभूत सुविधांची परिपूर्णता सुनिश्चित करणे, हा प्रधानमंत्री धरती आबा जनभागीदारी अभियानचा प्रमुख उद्देश आहे. या अभियानामध्ये शासनाच्या 17 विभागांच्या 25 सेवांचा समावेश करण्यात आला असून 5 जुलै 2025 रोजी पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या अभियानांतर्गत प्रत्यक्ष ग्रामस्तरावर शिबिरांच्या माध्यमातून आधारकार्ड, रेशनकार्ड, आयुष्मान भारतकार्ड, जातीचे प्रमाणपत्र, पीएम-किसान, जनधनखाते, काढणे अशा सेवा देण्यात येणार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात या शिबिरांचे आयोजन दिनांक 15 ते 30 जून दरम्यान करण्यात आले होते. त्या अनुषंगाने 5 जुलै रोजी सकाळी 11 वाजता प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृह, चंद्रपुर येथे “प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान” जिल्हास्तरीय कार्यक्रम आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक ऊईके, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे.
सदर कार्याक्रमास जिल्ह्यातील खासदार, आमदार तसेच जिल्हाधिकारी व सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. जिल्हास्तरीय कार्यक्रमास सर्व आदिवासी सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते व आदिवासी बंधु-भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी केले आहे.