आतंरराष्ट्रीय दर्जाचे तिनही स्मार्ट सिंथेटिक ट्रॅक राज्यात फक्त चंद्रपूर जिल्ह्यात

क्रीडा संकुलाच्या माध्यमातून जिल्हयात आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावे – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

Ø आतंरराष्ट्रीय दर्जाचे तिनही स्मार्ट सिंथेटिक ट्रॅक राज्यात फक्त चंद्रपूर जिल्ह्यात

 

चंद्रपूर, दि. 25: जिल्ह्यातील तरुणांना खेळात नैपुण्य प्राप्त करण्याच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध व्हाव्यात, बौद्धिक क्षमतेबरोबरच शारीरिक क्षमता साधता यावी तसेच क्रीडा क्षेत्रात आपले नावलौकिक प्राप्त करता यावे, यासाठी सर्व सोयी सुविधायुक्त क्रिडांगणाची निर्मिती करण्यात येत आहे. याची फलश्रृती म्हणून जिल्ह्याचा गौरव वाढविण्यासाठी क्रीडा संकुलाच्या माध्यमातून जिल्हयात आतरंराष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावेत, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

 

जिल्हा क्रीडा संकुलातील 400 मीटर सिंथेटिक ट्रॅक, फुटबॉल ग्राउंड, चेंजिग रुम व इतर क्रीडा सुविधांच्या 12 कोटी कामांचे लोकार्पण तसेच ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी वॉकिंग ट्रॅकच्या 51 लक्ष रुपये कामाचे भूमिपूजन पार पडले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी, क्रीडा व युवक सेवा उपसंचालक शेखर पाटील, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण गाडेगोणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, माजी महापौर राखी कंचर्लावार, अंजली घोटेकर, माजी उपमहापौर राहुल पावडे, ब्रिजभुषण पाझारे, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, कार्यकारी अभियंता सुनील कुंभे प्रामुख्याने उपस्थित होते.

 

सर्वांच्या आशिर्वादाने विकासाच्या झंझावातात पुन्हा एक पुष्प गुंफल्या जात आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, मागील काळात पालकमंत्री व वित्तमंत्री असतांना 2019 मध्ये या क्रीडा संकुलासाठी निधी उपलब्ध करून दिला. आता त्याचे लोकार्पण होत आहे, याचा आनंद आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थी, स्पर्धक, खेळाडू कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. सिंथेटिक ट्रॅकचे काम पूर्णत्वास आले तेव्हा काही क्रीडा क्षेत्रातील तज्ञांनी एक गोष्ट लक्षात आणून दिली की, सिंथेटिक ट्रॅकवर वॉकिंग केले तर त्याचे नुकसान होईल. याची दखल घेत त्वरित जिल्हाधिकाऱ्यांना सुचित करून सिंथेटिक ट्रॅकच्या बाजूला मातीचा वॉकिंग ट्रॅक निर्माण करण्याच्या सूचना दिल्या. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी तत्परतेने 50 लक्ष रुपये वॉकिंग ट्रॅक निर्मितीसाठी उपलब्ध करून दिले. येत्या दोन महिन्यात हा ट्रॅक पूर्णत्वास येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 

जनतेच्या आरोग्यासाठी हा वॉकिंग ट्रॅक फिरण्याचे उत्तम साधन होईल, या दृष्टीने कार्य करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. या संकुलातील जलतरण तलाव जुना झाला असून यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. चंद्रपूरमध्ये जसा धावपटूचा विचार केला तसाच जलतरणपटूचाही विचार करण्याच्या दृष्टीने 1 कोटी 57 लक्ष 15 हजार रुपयाची प्रशासकीय मान्यता मिळवून देत 1 कोटी 10 लक्ष रुपये त्वरित क्रीडा विभागाच्या खात्यात जमा केले.

 

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, युरोपच्या धर्तीवर येथील सैनिकी शाळेत ऑलंपिक स्तरावरचे स्टेडीयम निर्माण करण्यात आले आहे. जिल्हा क्रीडा संकुलात मोठ्या प्रमाणात नूतनीकरणाची आवश्यकता आहे. जिल्ह्याच्या क्रीडा संकुलाचा 56 कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. क्रीडा क्षेत्रातील बांधकाम करतांना या क्षेत्रातील कार्यरत मंडळी, तज्ञ व सामाजिक संघटना यांच्याकडून सूचना घ्याव्यात. 56 कोटी रुपयांचा आराखडा त्यांच्याकडून तपासून घ्यावा. जेणेकरून, कोणतीही गोष्ट सुटता कामा नये. चंद्रपूरातील जिल्हा स्टेडियम विदर्भातले सर्वात उत्तम स्टेडियम होईल, या दृष्टीने कार्य करण्यास पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले.

 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक व शारीरिक या सर्व क्षेत्रांमध्ये सर्वांगीण विकास व्हावा, या दृष्टीने कार्यक्रमाची आखणी केली आहे. आपल्या देशात या सर्व सुविधांची उत्तम वाढ व्हावी या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रामध्ये उत्तम दर्जाचे फक्त तीन सिंथेटिक ट्रॅक आहेत. ते म्हणजे जिल्हा क्रीडा संकुल, सैनिकी शाळा, विसापूर व बल्लारपूर येथील क्रीडा स्टेडियम याठिकाणी. तिन्ही सिंथेटिक स्मार्ट ट्रॅक महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात आहे. या ठिकाणी अनेक व्यवस्था निर्माण करण्यात आल्या आहेत. तर सैनिकी शाळा, विसापूर येथे युरोपच्या धर्तीवर फुटबाॅल ग्राउंडची निर्मिती करण्यात आली असल्याचे पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

 

वन अकादमी येथे सुंदर मिनी स्टेडियम उभारण्याचे काम पुढील काळात करण्यात येणार आहे. महाकाली मंदिरासाठी मार्च 2019 मध्ये 60 कोटी रुपये जमा करण्यात आले. तर ज्युबली हायस्कूलसाठी 8 कोटी रुपये व जुबली हायस्कूलच्या मागच्या 10 एकर ग्राउंडमध्ये वीर बाबुराव शेडमाके यांच्या नावाचे स्टेडियम निर्मितीसाठी 25 कोटी रुपये मार्च 2019 मध्ये जमा करण्यात आले आहे. नागपूर मुंबई व दिल्लीच्या धर्तीवर या जिल्ह्यात उत्तम असे एकही इनडोअर स्टेडियम नाही. त्यादृष्टीने 25 कोटी रुपयांमध्ये वातानुकूलित सोलरसहित वीर बाबुराव शेडमाके यांच्या पुतळ्यासह वीरता व शुरता निर्माण करणारे स्टेडियम या ठिकाणी उभे राहत आहे. वीर बाबुराव शेडमाके स्टेडियम व इनडोअर स्टेडियमच्या नवीन अंदाजपत्रकाच्या सूचना दिल्या आहेत. एकूण 47 कोटीमध्ये वातानुकूलित स्टेडियम चंद्रपूर मध्ये निर्माण होईल.

 

जलतरण तलावाच्या नूतनीकरणाकरता 1 कोटी 60 लाख रुपये देण्यात आले आहे. जिल्हा क्रीडा संकुलाचे अद्यावतीकरण आंतरराष्ट्रीय दर्जावरच्या सुविधा निर्माण करण्याकरीता 56 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. बीसीसीआयची क्रिकेट अकॅडमी चंद्रपूर जिल्ह्यात तयार करावी, अशी मागणी केली आहे. लवकरच बीसीसीआयची क्रिकेट अकॅडमी चंद्रपुरात तयार करण्यात येईल. अनेक विकासाचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहे. नवीन चंद्रपूरचं काम हाती घेण्यात आले आहे. या जिल्ह्यातील युवक-युवती उंच आकाशात भरारी घेऊ शकेल, यासाठी मोरवा धावपट्टीवर पुढील वर्षात फ्लाईंग क्लबची स्थापना करण्यात येणार आहे. येथील तरुण पायलटचे शिक्षण उपलब्ध होणार असून फ्लाईट उडवणारा तरुण मुंबई पुण्याचा नाही तर चंद्रपूर जिल्ह्याचा असेल, असा विश्वास पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

 

जुबली हायस्कूल, माता महाकाली मंदिर, अंचलेश्वर मंदिर, तीर्थक्षेत्र मार्कंडा या ठिकाणी देखील विकास कामे करण्यात येणार आहे. शैक्षणिक दर्जा जिल्ह्याचा उत्तम व्हावा यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत 200 कोटीचे टाटा टेक्नॉलॉजी सेंटर महाराष्ट्रात चंद्रपूर येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात सुरू झाले आहे. एमआयडीसीच्या 20 एकर क्षेत्रात भारत सरकारचे स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट उभारण्यात येत आहे. या स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटमधून जिल्ह्यातील युवक उत्तम दर्जाचे स्किल घेऊन आकाशात उंच भरारी घेऊ शकेल. अमृत महोत्सवी वर्षात महिला पुढे याव्यात म्हणून चंद्रपूर बल्लारपूरच्या मध्ये एसएनडीटी विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी 50 एकर जागा निश्चित करण्यात आली असून पहिल्या टप्प्याचे 55 कोटी रुपये मंजूर केले.

 

तत्पूर्वी पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते मागील 10 वर्षात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रावीण्यप्राप्त व पदक विजेत्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

 

जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या संकल्पनेतून जिल्हा क्रीडा संकुल येथे खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य सिंथेटिक ट्रॅक निर्माण करण्यात आले आहे. तसेच नागरिकांसाठी व ज्येष्ठांसाठी वॉकिंग ट्रॅकचे निर्माण देखील करण्यात आले आहे. संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात क्रीडा पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे व वाढविण्याचे उत्तम असे कार्य होत आहे. जिल्ह्यातील युवक-युवतींना याचा नक्कीच फायदा होईल व या माध्यमातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू जिल्ह्यातून निर्माण होण्यास मदत मिळेल.

 

प्रस्ताविकेत जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड म्हणाले, 400 मीटर सिंथेटिक ट्रॅक, फुटबॉल ग्राऊंड, चेंजिंग रूम आदी आंतरराष्ट्रीय दर्जांची अत्याधुनिक क्रीडा सुविधा विशेष निधीतून जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनात निर्माण करण्यात आल्या आहे. येत्या काही कालावधीत क्रीडा संकुलाचा कायापालट करण्यात येणार आहे. अद्ययावत क्रीडा सुविधा, वॉकिंग ट्रॅक, स्विमिंग पूल यांचे अद्ययावतीकरण लवकरच सुरू करण्यात येणार आहे. मिशन शक्ती अंतर्गत मागील कालावधीत उत्कृष्ट असे कार्य या जिल्ह्यात झाले असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार करण्याचे कार्य केल्या जात असल्याचे ते म्हणाले.