सीमावासियांच्या पाठिशी एकत्रितपणे उभे राहिले पाहिजे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सीमावासियांच्या पाठिशी एकत्रितपणे उभे राहिले पाहिजे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर, दि. १९ : सीमावासियांच्या पाठिशी सर्वपक्षीयांनी एकत्रितपणे उभे राहिले पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यासंबंधी उपस्थित केलेल्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी निवेदन केले.

मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, मराठी माणूस आणि मराठीच्या अस्मितेशी निगडीत या विषयावर केंद्राने गांभीर्याने दखल घेऊन बैठक बोलविली. या बैठकीत राज्याने ठोस भूमिका घेतली.

केंद्रीय गृहमंत्री यांनी घेतलेल्या बैठकीत सीमेवर राज्यातील गाड्या अडविल्या जातात, ही बाब लोकशाहीला धरून नाही, ही माहिती दिली. कुठल्याही परिस्थ‍ितीत अशा प्रकारची घटना होऊ नये. हा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे या विषयावर सामंजस्याची भूमिका घ्यावी. कर्नाटकचे मुख्यमंत्री अणि गृहमंत्री यांच्या उपस्थितीत केंद्राने भूमिका माध्यमांसमोर स्पष्ट केली आहे, असेही श्री. शिंदे यांनी सांगितले.

सीमावासियांसाठी शासन सकारात्मक असून काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 48 गावांसाठी दोन हजार कोटींची सिंचन योजना मंजूर केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी सभागृहाला दिली.