विना परवाना व अवैध ढाब्यावर मद्यसेवन करणारे व हॉटेल चालकावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई Ø न्यायालयाने दंड ठोठावल्याची जिल्ह्यातील पहिलीच घटना

विना परवाना व अवैध ढाब्यावर मद्यसेवन करणारे व हॉटेल चालकावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Ø न्यायालयाने दंड ठोठावल्याची जिल्ह्यातील पहिलीच घटना

 

चंद्रपूर,दि.17: नागपूर-चंद्रपूर रोडवरील मौजे लोणारा, भद्रावती येथील हॉटेल हॅप्पी सेवन डे या ढाब्यावर ग्राहकांना अवैधरीत्या मद्य पिण्याची परवानगी देतात अशा माहितीच्या आधारे दि. 25 सप्टेंबर 2022 रोजी वरोरा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक विकास थोरात यांच्या पथकाने सदर हॉटेलवर दारूबंदी गुन्ह्यासंबंधी छापा घातला असता हॉटेल चालक अवैधरित्या व दारूचा परवाना नसतांना 4 ग्राहकांना हॉटेलमध्ये अवैधरित्या दारू पिण्यास परवानगी दिल्याचे आढळून आले. त्यावरून सदर ठिकाणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 68अ, ब तसेच 84 अन्वये गुन्हा नोंद करून मद्यसेवन करणारे 4 इसम व हॉटेल मालक अशा 5 जणांना अटक करण्यात आली.

 

सदरच्या सर्व आरोपींना पुढील 24 तासाच्या आत न्यायालयासमोर हजर करून दोषारोपपत्र सादर करण्यात आले. न्यायालयाने सदर मद्यपी आरोपींना दि. 17 डिसेंबर 2022 रोजी दंड ठोठावल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील ही पहिलीच घटना ठरली आहे.

 

सदर कारवाई ही नागपूर,राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपआयुक्त मोहन वर्दे, अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनात वरोराचे निरीक्षक विकास थोरात, दुय्यम निरीक्षक संजय आक्केवार, चंदन भगत, जवान उमेश जुंबाडे, किशोर पेदूजवार, सुजित चिकाटे व दिलदार रायपुरे यांनी पार पाडली.

 

नाताळ व 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर, वरील प्रकारची कार्यवाही यापुढेही सतत सुरू राहणार आहे, त्यामुळे मद्यप्रेमींनी अवैध धाब्यावर किंवा अवैध ठिकाणी मद्य न पिता अधिकृत परवाना कक्षातच मद्य प्राशन करावे, असे वरोरा, राज्य उत्पादन शुल्काचे निरीक्षक विकास थोरात यांनी कळविले आहे.