भंडारा जिल्ह्यात धान भरडाईला सुरुवात जिल्हाधिका-यांची राईस मिलला भेट

भंडारा जिल्ह्यात धान भरडाईला सुरुवात जिल्हाधिका-यांची राईस मिलला भेट

· जिल्ह्यामध्ये धान भरडाईची गती वाढणार

भंडारा, दि. 16 : किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत जिल्ह्यामध्ये माहे नोव्हेंबर 2022 पासून धान खरेदीची सुरुवात झाली आहे. 15 डिसेंबर 2022 अखेर सुमारे 21 लक्ष क्विंटल किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान खरेदी झाली आहे. पुरेशी धान खरेदी झाल्याने जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखालील समितीने खरीप पणन हंगाम 2022-23 करिता धान भरडाईला मंजुरी दिली असून 15 डिसेंबर पासून प्रत्यक्ष धान भरडाईला सुरुवात झाली आहे.

साकोली तालुक्यातील भाजीपाले राईस मिल, परसोडी या राईस मिलला जिल्हा पणन अधिकारी यांचेकडून 2083.20 क्विंटल धान उचल आदेश देण्यात आले आहे. भाजीपाले राईस मिल यांनी भरडाई सुरु केली आहे. या राईस मिलला जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी भेट देऊन भरडाईची पाहणी केली. तसेच भाजीपाले यांनी सर्वप्रथम भरडाई सुरु केल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले. भरडाई केलेला तांदूळ जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत स्वस्त धान्य दुकानातून पात्र शिधापत्रिकाधारकांना शासनाच्या नियमानुसार वाटप करण्यात येणार आहे.

जिल्ह्यामध्ये पुढील काही दिवसांत भरडाईची गती वाढणार असून जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत स्वस्त धान्य दुकानात पात्र शिधापत्रिकाधारकांसाठी पुरेसा तांदूळ उपलब्ध होईल अशी माहिती जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिली. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी, उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी सचिन डोंगरे, तहसिलदार साकोली रमेश कुंभरे उपस्थित होते.