धान खरेदी नोंदणीकरिता 15 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

धान खरेदी नोंदणीकरिता 15 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

· शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

भंडारा, दि. 13 : भंडारा जिल्हा हा भाताचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात धानाची लागवड करत असून शेतकऱ्यांचे धान किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत शासनातर्फे खरेदी करण्यात येते. जिल्ह्यात ई-पीक पाहणी पुर्ण झालेली नसल्याने शेतकऱ्यांना त्यांचा ऑनलाईन 7/12 मिळण्यास अडचणी निर्माण झाल्याने व काही ठिकाणी धान कापणी सुरू असल्याने मुदतवाढ देण्याची मागणी शासनास प्राप्त झाली होती. खरीप पणन हंगाम 2022-23 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान व भरडधान्य खरेदी सुरू असून ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरिता 15 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांची ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी झालेली नाही अशा शेतकऱ्यांनी जवळच्या धान खरेदी केंद्रावर जावून दिनांक 15 डिसेंबर 2022 पुर्वी नोंदणी करून घ्यावी असे, आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.

ज्या शेतकऱ्यांच्या 7/12 वर मुदतीअभावी ई-पीक पेऱ्याची नोंद झालेली नाही अशा शेतकऱ्यांनी त्यांचे नाव, सर्वे नंबर, गट क्रमांक, खाते क्रमांक व खरीप पणन हंगाम 2022-23 करिता धानाखालील क्षेत्राची माहिती तहसिलदार अथवा संबंधित गावचे तलाठी यांच्याकडे जमा करावी. याबाबत काही अडचण असल्यास जिल्हा पणन कार्यालयाशी किंवा जिल्हा पुरवठा कार्यालयाशी संपर्क साधावा