जागतिक मृद दिन साजरा

जागतिक मृद दिन साजरा

 

भंडारा, दि. 8 : कृ‍षि उत्पादन पूर्ण क्षमतेने घेण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन या घटकास अनन्य साधारण महत्व आहे. पिकांच्या आवश्वकतेपेक्षा जास्त खते दिल्यास पिकांवर आणि जमिनीवर विपरीत परिणाम होतो. पिकांना आवश्यक असणारी अन्नद्रव्ये मातीतून उपलब्ध होत असल्याने खतांची मात्रा ठरविण्यापूर्वी माती परिक्षण करणे गरजेचे आहे. याबद्दल जनजागृती करण्यासाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालया अंतर्गत गुंथारा येथे रमेश गोमासे यांच्या शेतात जागतिक मृदा दिवस कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी डॉ. अर्चना कडू, उपविभागीय कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, लोकशाहीर कार्तिक मेश्राम, कृषी पर्यवेक्षक ए. बी.धांडे, कु. एम. के. लांडगे, एल. व्ही. बुरडे, डी. एम. जवांजर उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी एकाच पिकांवर अवलंबून न राहता विविध पिकांचे उत्पादन घ्यावे व त्यासोबतच शेती पूरक व्यवसाय करावा. मातीचे परिक्षण करावे यासाठी गरज भासल्यास जवळच्या कृषि सहाय्यकाकडून मदत घ्यावी, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. अर्चना कडू यांनी यावेळी सांगितले. यावेळी लोकशाहीर कार्तिक मेश्राम यांनी जागतिक ‘मृद दिन बर’ हे गीत व माती परीक्षण यावर सादरीकरण केले. ए. बी. धांडे यांनी माती नमुना कसे घ्यावे यावर प्रात्यक्षिक करुन दाखविले.

कार्यक्रमाचे संचालन तालुका तांत्रिक व्यवस्थापक एस. डी. वैरागडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार कृषि पर्यवेक्षक ए. बी धांडे यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमात गुंथारा, खुर्शिपार, राजेगाव येथील शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पी.पी गोस्वामी, जे.पी. रणदिवे, आर.डी. भोयर, अभिमन सार्वे, रोहित जगनाडे, दयाराम गोमासे, प्रविण सार्वे यांनी सहकार्य केले.