दिव्यांगांनी आत्मविश्वासाने नविन कौशल्ये आत्मसात करावी – आयुक्त विपीन पालीवाल  

दिव्यांगांनी आत्मविश्वासाने नविन कौशल्ये आत्मसात करावी – आयुक्त विपीन पालीवाल  

जागतीक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांगांचा सन्मान

३ लाभार्थ्यांना रु. ५० हजार कर्जाचे मंजुरी प्रमाणपत्र  

१० लाभार्थ्यांना युडीआयडी कार्ड वाटप

३० यशस्वी उद्योजकांना सन्मानपत्र

 

चंद्रपूर ६ डिसेंबर – आज दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी दिव्यांग मंत्रालय सुरु करण्यात आले आहे, शासनाच्या अनेक योजना आहेत ज्यातुन कर्ज घेऊन व्यवसायाची उभारणी करता येऊ शकते तेव्हा जीवनाला नवी दिशा देण्यास दिव्यांगांनी आत्मविश्वासाने नविन कौशल्ये आत्मसात करण्याचे आवाहन आयुक्त विपीन पालीवाल यांनी केले.

चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे जागतीक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांगांना व्यावसायिक मार्गदर्शन, युडीआयडी कार्ड व दिव्यांग लाभार्थ्यांना कर्ज मंजुर प्रमाणपत्र वितरण समारंभ ५ डिसेंबर रोजी मनपा सभागृहात आयोजीत करण्यात आला होता त्याप्रसंगी ते बोलत होते. समाजात आपले स्थान कसे बळकट होईल या दृष्टीने दिव्यांगांनी विचार करणे व सक्षम होणे आवश्यक आहे. यासाठी स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा, कोणताही व्यवसाय मनापासुन करा,आज व्यवसायासाठी ९५ टक्केपर्यंत कर्ज मिळेल अश्या शासनाच्या योजना आहेत त्यांचा लाभ घेऊन आपल्या कुटुंबाला आधार देण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.

या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे कार्यक्रमाचे प्रास्ताविक,स्वागत,संचालन तसेच आभारप्रदर्शन दिव्यांगांनीच केले. कार्यक्रमांतर्गत रु. ५० हजार कर्जाचे मंजुरी प्रमाणपत्र ३ लाभार्थ्यांना देण्यात आले तसेच १० लाभार्थ्यांना युडीआयडी कार्ड, ३० यशस्वी उद्योजकांना सन्मानपत्र देण्यात आले. चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत १३४८ दिव्यांगांची नोंदणी करण्यात आली असुन त्यांच्या सक्षमीकरणाकरीता मनपा उत्पन्नाच्या ५ टक्के निधी राखुन ठेवण्यात येतो. याअंतर्गत १२१५ दिव्यांग बांधवांना ( २,३३,५४००० ) २ कोटी ३३ लक्ष ५४ हजार रुपये उदरनिर्वाहाकरीता व आवश्यक साहीत्य खरेदी करण्याकरीता वितरीत करण्यात आले आहेत.

मनपामार्फत कोरोना काळात ८७९ दिव्यांग लाभार्थ्यांना अन्न धान्य किट करीता ६ लक्ष ५९ हजार रुपये खर्च करण्यात आले आहे. तसेच व्हील चेअरचे वाटपही करण्यात आले आहे. विविध ठिकाणी रॅम्प तयार करण्यात आले आहे. मनपा सार्वजनिक शौचालयात दिव्यांगांसाठी विशेष सोय करण्यात आली आहे.दीनदयाल अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत विविध व्यवसाय उदा. ई रिक्षा खरेदी करणे, किराणा,कपडा, शिवणकाम केंद्र,संगणक प्रशिक्षण केंद्र, झेरॉक्स सेंटर व याव्यतिरीक्त इतर व्यवसायाकरीता दिव्यांग व्यक्तींना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत रुपये २ लक्ष ( दोन लाख रुपये ) पर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. तसेच दिव्यांग कल्याण योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तीकरीता त्यांनी घेतलेल्या कर्जावर चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे २५ टक्के अनुदानसुद्धा देण्यात येते.

या प्रसंगी व्यावसायिक संधी आणि व्यावसायिक व्यक्तिमत्त्व या विषयावर प्रा. श्याम हेडाऊ तसेच येरमे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी डि.आय.सी. चे मुख्य व्यवस्थापक तुषार आठवले, येरमे , एस.बी.आय.चे अधिकारी, दिव्यांग कौशल विकास मल्टिपर्पज सोसायटीचे सदस्य तसेच दिव्यांग बंधु भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना शिंदे, प्रास्ताविक निलेश पाझारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता रोशनी तपासे, चिंतेश्वर मेश्राम, सुषमा कर्मांकर, खडसे, मून, लोणारे, पाटील यांनी अथक परिश्रम घेतले.