गती वाहनाची…..माती जीवाची Ø 10 महिन्यात 356 मृत्यु, 309 गंभीर तर 235 किरकोळ जखमी

गती वाहनाची…..माती जीवाची

Ø 10 महिन्यात 356 मृत्यु, 309 गंभीर तर 235 किरकोळ जखमी

चंद्रपूर, दि. 6 : आजच्या धावपळीच्या युगात वेळेला अनन्यसाधारण महत्व असले तरी स्वत:चा जीव हा अमुल्य आहे. वेळ आणि गतीसोबत स्पर्धा करण्याच्या नादात आपल्याच जीवनाला ब्रेक लागत आहे. होय, हे वास्तव आहे. चंद्रपूर जिल्ह्यात गत 10 महिन्यात (जानेवारी ते ऑक्टोबर) रस्त्यावर 689 अपघातांची नोंद झाली असून यात 356 जणांनी आपला जीव गमावला आहे. यात 309 गंभीर जखमी आणि 235 किरकोळ जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे मृतकांमध्ये सर्वाधिक 229 मृत्यु दुचाकीस्वारांचे आहेत. रस्त्यावर वाहन चालवितांना हेल्मेट न वापरणे आणि वाहनाची गती हे प्रमुख कारण निदर्शनास आले आहे.

31 ऑक्टोबर 2022 पर्यंत जिल्ह्यात 6 लक्ष 68 हजार 862 वाहनांची अधिकृत नोंदणी झाली आहे. यात दुचाकींची संख्या 5 लक्ष 42 हजार 267 आहे. गत दहा वर्षांचा विचार केला तर 2010 पासून 2022 पर्यंत जिल्ह्यात 7214 रस्ते अपघात झाले आहेत. यात सर्वाधिक जास्त 2014 मध्ये 931 तर सर्वात कमी 2020 मध्ये 565 अपघातांची नोंद आहे. 2022 च्या पहिल्या 10 महिन्यातच 689 अपघात झाले असून 356 जणांनी आपला जीव गमावला आहे. यात दुचाकीस्वारांची संख्या 229 आहे. सर्वाधिक जास्त अपघात कोणत्या वेळेत झाले, यालासुध्दा विशेष महत्व आहे. सायंकाळी 6 ते रात्री 9 हा अपघाताचा कर्दनकाळ मानला जातो.

जिल्ह्यात झालेल्या 689 अपघातांमध्ये सर्वाधिक 177 अपघात याच वेळेत झाले आहेत. सकाळी 6 ते 9 या वेळेत (50 अपघात), सकाळी 9 ते दुपारी 12 (93 अपघात), दुपारी 12 ते 3 (101 अपघात), 3 ते सायंकाळी 6 (123 अपघात), सायं 6 ते रात्री 9 (177 अपघात), रात्री 9 ते 12 (107 अपघात), मध्यरात्री 12 ते 3 (18अपघात) आणि पहाटे 3 ते सकाळी 6 या वेळेत 20 अपघात झाले आहेत. यात राष्ट्रीय महामार्गावर 362, राज्य महामार्गावर 107 तर इतर रस्त्यांवर 220 अपघात आहेत. जिल्ह्यात मृत्यु झालेल्या 356 जणांमध्ये 229 दुचाकीस्वार, 59 पादचारी, 24 मृत्यु कार, टॅक्सी, व्हॅनचे, 15 ट्रक्स आणि लॉरी, 14 सायकलस्वार, 4 ऑटोरिक्षा, 1 मृत्यु बसचा तर इतर वाहनांनी झालेल्या 10 मृत्युंचा समावेश आहे.

जिल्ह्यात झालेले अपघात हे वाहनांची गती, हेल्मेटचा वापर न करणे, सीटबेल्ट न लावणे, दारू किंवा नशा पाणी करून वाहन चालविणे, विरुध्द दिशेने येणे, वाहन चालवितांना मोबाईल फोनचा वापर आदी कारणांमुळे झाल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे 18 वर्षांखालील 19 मृत्यु, वयोगट 18 ते 25 (60 मृत्यु), वयोगट 25 ते 35 (97 मृत्यु), वयोगट 35 ते 40 (76 मृत्यु), वयोगट 40 ते 45 (85 मृत्यु) आणि 45 ते 60 या वयोगटातील 19 मृत्युंची नोंद आहे.

जिल्ह्यातील प्रलंबित ब्लॅकस्पॉटची कामे : केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक व महामार्ग विभागाच्या व्याख्येनुसार रस्त्यावरील 500 मीटर लांबीचा असा तुकडा जेथे मागील तीन वर्षात 5 रस्ते अपघात किंवा 10 व्यक्तींचा मृत्यु झाला आहे. या व्याख्येनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्गाच्या अहवालानुसार एकूण 28 ठिकाणी ब्लॅकस्पॉट निश्चित करण्यात आले होते. यापैकी 10 ब्लॅकस्पॉटची कामे पूर्ण करण्यात आली असून दोन्ही बाजुंनी सर्व्हिस रोड, दोन्हीबाजुला थर्मापेंटचे ब्रेकर, झेब्राक्रॉसिंग पट्टे, रात्री चमकणारे रिफ्लेक्टर, वेगमर्यादेचे बोर्ड, रात्रीला पिवळा लाईट असणारे सिग्नल, रेडीयमचे टर्निंग बोर्ड, तुटलेल्या दुभाजकांची दुरुस्ती, रस्त्यांचे रुंदीकरण करणे आदी कामांचा समोवश आहे.

तर प्रलंबित 18 ब्लॅकस्पॉट पुढीलप्रमाणे आहे. यात चंद्रपूर – नागपूर रोडवरील पडोली, घोडपेठ, सुमठाणा, चुनाळा टी पॉईंट आणि कोंडाफाटा, राजूरा – आसिफाबाद रोडवरील सोंडो, राजूरा – गडचांदूर रोडवरील पांढरपौनी आणि आर्वी, गडचांदूर – कोरपना रोडवरील गडचांदूर, वरोरा – चिमूर रोडवरील चारगाव, ब्रम्हपूरी –

वडसा रोडवरील हरदोली, चंद्रपूर – मूल रोडवरील लोहारा, वलनीफाटा, चिचपल्ली, केसलाघाट, बंगाली कॅम्प, खेडीफाटा, व्याहाड येथील रस्त्यांचा समावेश आहे.

जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे कार्य : सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या रिट याचिकेमधील (क्रमांक 215/2012) निर्णयानुसार देशातील रस्ते अपघातांची संख्या कमी करण्यासाठी जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा रस्ता सुरक्षा समिती स्थापन करण्यात आली आहे. यात जिल्ह्यातील रस्ता सुरक्षा कामकाजाचा आढावा घेणे, रस्ते अपघातांच्या सांख्यिकी माहितीचे अवलोकन करणे, रस्त्या अपघातांची कारणमिमांसा करणे, रस्ता सुरक्षा मानकांची अंमलबजावणी, रस्ते अपघात व हानी कमी करण्यासाठी विशिष्ठ उद्दिष्टे ठेवून कृती आराखडा तयार करणे, वेगमर्यादा, वाहतूक सुरक्षित करण्याबाबतच्या उपायांची समिक्षा करणे, जनजागृती – सक्ती – आपात्कालीन परिस्थिती याबाबत चर्चा व अंमलबजावणी करणे, अपघातप्रसंगी मदत करणा-या नागरिकांना प्रोत्साहित करावयाची कार्यपध्दती निश्चित करणे, शहरात व ग्रामीण भागात ट्राफिक पार्कसह वाहतूक सुरक्षा प्रशिक्षण केंद्राची स्थापना करणे, रस्ता सुरक्षा अभियानास उत्तेजन देणे, रस्ता सुरक्षितता संबंधित अन्य कोणत्याही विषयांवर विचारविनीमय करणे, असा मुख्य उद्देश समितीचा आहे.