गर्जे मराठी संस्थेतर्फे स्टार्टअप्ससाठी प्रशिक्षण उपक्रम नवउद्योजकांना मोफत मार्गदर्शन; दहा लाखांची बक्षिसे

गर्जे मराठी संस्थेतर्फे स्टार्टअप्ससाठी प्रशिक्षण उपक्रम

नवउद्योजकांना मोफत मार्गदर्शन; दहा लाखांची बक्षिसे

 

पुणे, ता. ४ : अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील गर्जे मराठी ग्लोबल संस्थेतर्फे नवउद्योजकांसाठी ‘गर्जे मराठी अमृत’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतून राज्यातील तब्बल ७५ स्टार्टअप्स उद्योजकांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ञांकडून मोफत मार्गदर्शन देणार आहे. या ७५ मधून सर्वोत्कृष्ट दहा उद्योजकांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार आहे.

 

संस्थेचा जगभरातील मराठी माणसांना ज्ञान, उच्चशिक्षण, उद्योजकता आणि विचारांची देवाण घेवाणीसाठी एकत्र आणणे हा उद्देश आहे. गर्जे मराठी संस्थेतर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ‘गर्जे मराठी अमृत’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम महाराष्ट्रातील नवउद्योजकांना सर्वतोपरी निःशुल्क असेल, असे गर्जे मराठी ग्लोबल संस्थेचे संस्थापक आनंद गानू यांनी सांगितले आहे.

 

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली १ जानेवारी २०२३ पासून हा उपक्रम सुरु होईल. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नवउद्योजकांना अर्ज भरावा लागेल. राज्यातील विविध जिल्ह्यांतील नवउद्योजकांकडून आलेल्या अर्जांची छाननी केली जाईल. त्यामधून सुमारे ७५ नवउद्योजकांना प्रशिक्षणासाठी निवडले जाईल. अठरा आठवड्याच्या प्रशिक्षणानंतर परीक्षकांमार्फत दहा सर्वोत्कृष्ट उद्योजकांची निवड केली जाईल. त्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल. तसेच त्यांच्यासाठी गुंतवणूकदार उपलब्ध करून दिले जातील, असेही संस्थेच्यावतीने पुण्यातील समन्वयक आणि उद्योजिका मृणालिनी जगताप यांनी सांगितले आहे.

 

*उपक्रमाबाबत थोडक्यात*

 

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील कमीतकमी दोन स्टार्टअप्स उद्योजकांना मार्गदर्शन मिळेल

 

अठरा आठवड्याचे मार्गदर्शन

 

तंत्रज्ञान, आर्थिक, विपणन, संगणक क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शन करणार.

 

उत्कृष्ट उद्योजकांना गुंतवणूकदार उपलब्ध करून देणार

 

सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत २० डिसेंबर २०२२.

 

गुगल डॉक्स अर्जाची लिंक – http://bit.ly/GMG_Amrut_application_form

 

अधिक माहितीसाठी संपर्क

ईमेल garjemarathi@gmail.com

 

श्रीमती मृणालिनी जगताप, +91 76666 87375