रस्ते अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करा – जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

रस्ते अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करा – जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

 जिल्हा रस्ता सुरक्षा समिती बैठक

 नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन

 

भंडारा, दि. 1 : रस्ते अपघातांची व त्यामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या ही बाब निश्चितच गंभीर आहे. अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. कुटुंबातील कमावती व्यक्ती अपघातात दगावल्यामुळे कुटुंबावर विपरीत परिणाम होतो. अपघातामुळे होणारी मनुष्यहानी टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केल्या.

 

जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. अपर जिल्हाधिकारी सुनिल विंचनकर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा यांच्यास‍ह वाहतूक, सार्वजनिक बांधकाम विभाग प्रमुख उपस्थित होते.

 

जिल्ह्यात मागील पाच वर्षात अपघातांच्या संख्येत वाढ झाली असून जानेवारी 2022 ते 27 नोव्हेंबर 2022 पर्यंत जिल्ह्यात एकूण 426 अपघात झाले. या अपघातात 154 व्यक्तींचा मृत्यू झाला तर 216 गंभीर जखमी झाले. 25 ते 45 वयोगटातील वयोगटातील 42 पुरुष व 6 महिला मृत्यूमुखी पडल्या. सन 2018 मध्ये 413 अपघात 151 मृत्यू, सन 2019 मध्ये 393 अपघात 146 मृत्यू, सन 2020 मध्ये 308 अपघात 137 मृत्यू व सन 2021 मध्ये 382 अपघात 152 मृत्यू झाल्याची माहिती यावेळी बैठकीत देण्यात आली.

 

शालेय विद्यार्थी हे उद्याचे जबाबदार नागरिक असल्याने शिक्षण विभागाने सर्व शाळांमध्ये वाहतूक विभाग, परिवहन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा बाबत जनजागृती उपक्रम नियमित राबवावे. रस्ते अपघाताची आकडेवारी चिंताजनक असून अपघात कमी करण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांची आवश्यकता असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

 

जिल्ह्यातील अपघात कमी करण्यासाठी रस्त्यावर सूचना फलक लावावे, रस्ते दुभाजकाचा आढावा घ्यावा, रस्ते वळणावरील झाडी – झुडपे हटवावे व खड्डे बुजविण्यात यावेत यासह कायमस्वरूपी व तात्पुरत्या स्वरूपाच्या उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. नगर परिषदेने शहरातील आवश्यक ठिकाणी गरजेनुसार डिजिटल लाईट सिग्नल बसवावे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक नियंत्रण शाखा यांनी जिल्ह्यातील सर्व शहरात आवश्यक ठिकाणी डिजिटल लाईट सिग्नल्स बसविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.