ग्रामीण भागात 1 ते 4 व शहरी भागात 1 ते 7 वीचे वर्ग सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी

ग्रामीण भागात 1 ते 4 व शहरी भागात 1 ते 7 वीचे

वर्ग सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी

चंद्रपूर, दि.2 डिसेंबर:  शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात इयत्ता 1 ली ते 4 थी व शहरी भागात इयत्ता 1 ली ते 7 वीचे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्यास परवानगी प्रदान करण्यात येत आहे. त्यासंबंधीचे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित केले आहे.

समितीने शाळा सुरू करण्यापूर्वी दिलेल्या बाबींवर चर्चा करणे आवश्यक आहे. यामध्ये समितीने शाळा सुरू करण्यापूर्वी संबंधित शहरात, गावात कोविडचा प्रादुर्भाव कमी झालेला असावा. सर्व शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये. कोविडसंबंधी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, जास्त विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रांमध्ये, एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये 6 फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त 15 ते 20 विद्यार्थी, सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना वैद्यकीय अधिकारी अथवा नजीकच्या आरोग्य केंद्रांमध्ये पाठविणे. विद्यार्थी कोविडग्रस्त झाल्याचे आढळल्यास तात्काळ शाळा बंद करून शाळा निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही मुख्याध्यापकांनी करून घ्यावी व  विद्यार्थ्यांचे विलगीकरण करावे, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने वैद्यकीय उपचार सुरू करावेत. तसेच कोविडग्रस्त विद्यार्थ्यांच्या शेजारील विद्यार्थ्यांची सुद्धा कोरोना चाचणी करून घ्यावी. शाळा सुरू करतांना मुलांना टप्प्याटप्प्यात शाळेत बोलविण्यात यावे. संबंधित शाळेतील शिक्षकांनी राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच शहरात किंवा गावात करावी.

शाळेत स्वच्छता व निर्जंतुकीकरण विषयक सुविधा सुनिश्चित करणे:

शाळेत हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणे. तापमापक, जंतुनाशक, साबण, पाणी इत्यादी आवश्यक वस्तूंची उपलब्धता तसेच शाळेची स्वच्छता व निर्जंतुकीकरण स्थानिक प्रशासनाने (ग्रामीण व शहरी) सुनिश्चित करावे. एखाद्या शाळेत विलगीकरण केंद्र, कोविड सेंटर असल्यास स्थानिक प्रशासनाने ते इतर ठिकाणी स्थलांतरित करावे. स्थानिक प्रशासनाने अशा शाळेचे हस्तांतरण शाळा व्यवस्थापनाकडे करण्यापूर्वी त्यांचे पूर्ण निर्जंतुकीकरण करूनच हस्तांतर शाळेकडे करावे.

शिक्षकांची कोविड चाचणी:

संबंधित शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोविड-19 साठीची 48 तासापूर्वीची आरटीपिसीआर चाचणी करावी. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सदर चाचणीचे प्रयोगशाळेने दिलेले प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापनास सादर करावे. ज्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह असतील त्यांनी कोविडमुक्त झाल्यानंतरच शाळेत उपस्थित राहावे. ज्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आहेत, त्यांनी शाळेत उपस्थित राहतांना कोविड-19 संदर्भातील सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक राहील. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविड लसीकरण (दोन्ही डोज) झालेल्यांनाच शाळा, कार्यालयांमध्ये प्रवेश द्यावा.

बैठक व्यवस्था:

वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे बैठक व्यवस्था असावी. बैठक व्यवस्थेमध्ये दोन विद्यार्थ्यांदरम्यान 6 फुटाचे अंतर असावे, विद्यार्थ्यांचे नाक व तोंड मास्कने पूर्णतः झाकलेले असले पाहिजे याबाबत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सातत्याने सांगावे. शाळेत दर्शनी भागावर, शारीरिक अंतर, मास्कचा वापर, इत्यादी संदर्भात मार्गदर्शक सूचना प्रदर्शीत कराव्यात.

पालकांची संमती व पालकांनी घ्यावयाची दक्षता:

विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची संमती आवश्यक असेल. याबाबत शाळा व्यवस्थापन समितीने पालकांशी चर्चा करावी. आजारी असलेल्या किंवा लक्षणे असलेल्या मुलांना पालकांनी शाळेत पाठवू नये. विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पूर्णतः पालकाच्या संमतीवर अवलंबून असेल. शाळा सुरू करण्यापूर्वी त्या शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे. शाळेतील कर्मचाऱ्यांना त्यांना नेमून दिलेल्या कामाव्यतिरिक्त आणीबाणीच्या प्रसंगी इतर कर्मचाऱ्यांची कामे करण्यासाठी प्रशिक्षित करावे.

सदर आदेशाची कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा संघटना यांनी सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा,2005 व भारतीय दंड संहिता तसेच साथरोग कायदा,1897 अन्वये दंडनीय व कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. सदर आदेश संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात दि. 1 डिसेंबर 2021 पासून पुढील आदेशापर्यंत लागू राहील, असे जिल्हादंडाधिकारी अजय गुल्हाने यांच्या आदेशात नमूद आहे.