दिव्यांग व्यक्तींना व्यवसायास २ लाखापर्यंत कर्ज घेतलेल्या कर्जावर मनपातर्फे २५ टक्के अनुदान ३१ डिसेंबर पूर्वी करावा अर्ज

दिव्यांग व्यक्तींना व्यवसायास २ लाखापर्यंत कर्ज

घेतलेल्या कर्जावर मनपातर्फे २५ टक्के अनुदान

३१ डिसेंबर पूर्वी करावा अर्ज

 

चंद्रपूर ३० नोव्हेंबर – चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरु करावयाचा असल्यास किंवा सुरु असलेला व्यवसाय वाढवायचा असल्यास राष्ट्रीयकृत बँकेमार्फत रुपये २ लक्ष ( दोन लाख रुपये ) पर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत १७ नागरीकांनी अर्ज केला असुन अर्जदारांना लाभान्वित करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

चंद्रपूर महानगरपालिका दीनदयाल अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत विविध व्यवसाय उदा. ई रिक्षा खरेदी करणे, किराणा,कपडा, शिवणकाम केंद्र,संगणक प्रशिक्षण केंद्र, झेरॉक्स सेंटर व याव्यतिरीक्त इतर व्यवसायाकरीता दिव्यांग व्यक्तींना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत रुपये २ लक्ष ( दोन लाख रुपये ) पर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. तसेच दिव्यांग कल्याण योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तीकरीता त्यांनी घेतलेल्या कर्जावर चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे २५ टक्के अनुदान देण्यात येणार आहे.

मनपा क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींना स्वतःच्या व्यवसायासाठी कर्जाची आवश्यकता असल्यास दीनदयाल अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान कार्यालय, ज्युबली हायस्कूल समोर, कस्तुरबा रोड या कार्यालयात कार्यालयीन वेळेत भेटुन अधिक माहीती घेता येईल. कर्जासाठी आधार कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र, बँक पासबुक, व्यवसायाचे कोटेशन, २ पासपोर्ट फोटो, राशन कार्ड, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र (टीसी ) ही आवश्यक कागदपत्रे असुन कागदपत्रांची प्रत्येकी २ प्रती लाभार्थ्यांना आणावे लागतील.

योजनेचा लाभ घेण्यास ३१ डिसेंबर पूर्वी नागरीकांनी अर्ज करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.