नवमतदार नोंदणीसाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे  – मतदार यादी निरीक्षक विजयालक्ष्मी बिदरी

नवमतदार नोंदणीसाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे  – मतदार यादी निरीक्षक विजयालक्ष्मी बिदरी

· राजकीय पक्ष प्रतिनिधी सोबत बैठक

भंडारा, दि. 28 : भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी व मतदारांना आपले मतदान ओळखपत्रासोबत आधार कार्ड जोडणीसाठी प्रोत्साहित करावे. तसेच नवमतदारांची नोंदणी करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन मतदार यादी निरीक्षक तथा नागपूर विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी केले.

 

भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नागपूर विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांची मतदार यादी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मतदार यादी तपासणाच्या अनुषंगाने मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक 28 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिषद कक्ष, भंडारा येथे आढावा बैठक घेण्यात आली. या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी योगेश कुंभेजकर, उपजिल्हा निवडणूक धिकारी महेश पाटील, उपजिल्हाधिकारी रोहयो श्रीपती मोरे, उपजिल्हाधिकारी (सा.मा) आकाश अवतारे, उपविभागीय अधिकारी भंडारा रविंद्र राठोड, उपविभागीय अधिकारी तुमसर बी. वैष्णवी, उपविभागीय अधिकारी साकोली मनिषा दांडगे व राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

मतदार यादी मधील मयत मतदार, कायम स्थलांतरीत मतदार, लग्न होऊन बाहेर गेलेल्या महिलांच्या नावाची वगळणी, लग्न होऊन गावात आलेल्या महिलांच्या नावाची नोंदणी, दुबार नोंद असलेल्या मतदारांची नावे कमी करणे व ज्यांचे दिनांक 1 जानेवारी 2023 रोजी 18 वर्ष (जन्म दिनांक 31 डिसेंबर 2004 नंतर) पूर्ण होत आहे त्यांच्याकडून नवीन मतदार नोंदणीसाठी अर्ज घेणे याकामावर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला मतदार यादी निरीक्षक विजयालक्ष्मी बिदरी यांनी यावेळी दिले.

 

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी 9 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2022 पर्यंत असून मतदार नोंदणीसाठी 3 व 4 डिसेंबर 2022 रोजी विशेष शिबिरीचे आयोजन करण्यात येणार आहे, 26 डिसेंबर 2022 रोजी दावे व हरकती निकाली काढण्यात येणार असून 5 जानेवारी 2023 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे.

 

नवीन मतदारांसाठी अर्जाचा नमुना-6, मतदार यादी प्रमानिकरण करण्यासाठी आधार क्रमांकाच्या माहितीबाबत नमुना -6 ब, प्रस्तावित समावेशाबाबत आक्षेप नोंदविण्यासाठी /विद्यमान मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी नमुना-7 व रहिवाश्यांचे स्थलांतर/विद्यमान मतदार यादीतील नोंदीची दुरुस्ती/ कुठल्याही दुरुस्तीशिवाय मतदार ओळखपत्र बदलून देणे/दिव्यांग व्यक्ती म्हणून चिन्हांकित करण्यासाठी अर्जाचा नमुना-8 देण्यात आलेले आहे.