चंद्रपूर मनपा चे उपक्रम व्हॅक्युम रोड स्विपिंग मशीनद्वारे स्वच्छता

व्हॅक्युम रोड स्विपिंग मशीनद्वारे स्वच्छता

रस्ता, रस्ता दुभाजकलगतची धुळ होते संकलीत

राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत मनपाचा पुढाकार  

 

चंद्रपूर १८ नोव्हेंबर – चंद्रपूर शहरातील रस्त्यांवर व्हॅक्युम रोड स्विपिंग मशीनने स्वच्छता करण्यात येत आहे. चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत तीन मशीन घेण्यात आल्या असुन जो कचरा मानवी प्रयत्नांनी स्वच्छ करता येत नाही तो स्वच्छ करण्याचे काम या व्हॅक्युम रोड स्विपिंग मशीन करीत आहेत.

मनपा स्वच्छता विभागामार्फत सर्व रस्ते झडाईद्वारे नियमित स्वच्छ करण्यात येतात. मात्र यातील काही कचरा इतक्या सुक्ष्म स्वरूपाचा असतो की जो झाडू किंवा इतर स्वच्छतेच्या साधनांनी काढता येत नाही. ही मुख्यतः धुळ असते आणि या धुळीत सूक्ष्म कण ( PM2.5 आणि PM10) असतात जे आरोग्यास धोकादायक मानले जातात. यामुळे वायु प्रदुषण वाढुन सार्वजनिक आरोग्यासंबंधित धोक्यांमध्ये वाढ होते. याचा विशेषतः लहान मुले, वृद्ध प्रौढ लोकसंख्या आणि इतर जोखीम असलेल्या लोकसंख्येवर परिणाम होतो.

हा धोका टाळण्यास चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या निधीमधून तीन व्हॅक्युम रोड स्विपींग मशीन खरेदी करण्यात आलेल्या आहेत. रस्ता,दुभाजकाच्या कडेला जमा होणारी धुळ आता व्हॅक्युम रोड स्विपिंग मशीनद्वारे संकलीत करण्यात येत आहे. याकरीता स्विपिंग मशीनच्या दोन्ही बाजुला व मध्यभागी ब्रश दिला गेला असून मध्यभागी असलेल्या ब्रश मधील व्हॅक्यूम पाईपच्या सहाय्याने धुळ कंटेनरमध्ये जमा होते. कंटेनर मधे जमा झालेला कचरा नंतर डंपिंग यार्डवर पाठविण्यात येतो.

या मशीनद्वारे ८ तास स्वच्छता कार्य केल्या जात असुन एक तासात १ ते १५ किलोमीटर प्रतितास वेगाने रस्ते झाडले जातात. शहर स्वच्छता तसेच शुद्ध हवेच्या दृष्टीने हे एक महत्वाचे पाउल असून चंद्रपूर शहरातील श्वसन संबधी आजार व त्वचेचे आजाराचे प्रमाण शहरातून कमी होण्यास व प्रदूषण नियंत्रणात यामुळे मोठा लाभ मिळणार आहे